फुल व्यापाऱ्यांना मिळणार हक्‍काचा बाजार

पिंपरी – पिंपरी शगुन चौक येथील व्यापाऱ्यांचे लवकरच पुनर्वसन होणार असून क्रोमा शेजारील जागा फुल विक्रेत्यांना देण्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे फुल आडत व्यापाऱ्यांना आता हक्काचा बाजार उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल पिंपरी येथील फुल आडत व्यापाऱ्यांनी महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी फुल संघटनेचे अध्यक्ष राजकुमार मोरे, पिंपरी उपबाजार प्रमुख राजू शिंदे, सचिव शिवाजी सस्ते, बाबा रासकर, बाबा तापकीर, अजित तापकीर, संतोष जाधव, अमोल राक्षे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेली अनेक वर्षापासून पिंपरी येथे सकाळी फुल बाजार भरत आहे. मात्र हा बाजार शगुन चौकातील रोडवर भरत असल्यामुळे अनेक अडचणींना येथील फुल आडत व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सकाळी 10 वाजेपर्यंतच हा फुल व्यापार होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला देखील योग्य अशी किंमत मिळत नाही. प्रसंगी कवडीमोल किंमतीमध्ये हा माल विकावा लागतो. तसेच सणासुदीच्या काळात येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फुल बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मागील काही वर्षांपासून येथील व्यापाऱ्यांनी केली होती. पिंपरी येथील क्रोमाशेजारी जागा फुल मार्केटला उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी त्यांनी पिंपरी पालिकेकडे पत्र व्यवहार केला.

नोव्हेंबर 2018 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये एक बैठक होऊन ही जागा फुल आडत व्यापाऱ्यांना देण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार तात्पुरते 30 पत्राशेडचे गाळे उभारून ते 11 महिन्याच्या भाडेतत्वावर या व्यापाऱ्यांना देण्यात येणार आहे. या जागेत भविष्यात महापालिकेचे मल्टिस्टोअरेज पार्किंगची इमारत होणार असून त्या इमारतीमधील तळमजला हा फुल विक्रेत्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे फुल आडत व्यापाऱ्यांना आता हक्काचे बाजार उपलब्ध होणार असून लवकरच त्यांचे नवीन जागेत पुनर्वसन होणार असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंपरी येथील फुल आडत व्यापाऱ्यांना क्रोमाशेजारी जागा उपलब्ध करून देण्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने मान्यता दिली. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पिंपरी-चिंचवड शहरात आता स्वतंत्र फुल बाजार होणार असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या विकासात आणखीच भर पडणार आहे.
– राजू शिंदे, पिंपरी उपबाजार प्रमुख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)