File Photo

पिंपरी – पिंपरीतील शगुन चौकात फुलांचा बाजार भरतो. याठिकाणी शेतकरी, विक्रेते, ग्राहक यांची गर्दी जमलेली असते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी फुल विक्रेत्यांनी फुल बाजारासाठी जागा मिळावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या मागे तगादा लावला होता. त्यासाठी जागा निश्‍चित झाली असून येत्या दहा दिवसांत हा विषयी मार्गी लावू, असे आश्‍वासन महापौर राहुल जाधव यांनी दिले आहे.

अनेक वर्षापासून मावळ, मुळशी, खेड, हवेली, येथून शेतकरी फुले विकण्यासाठी पिंपरी बाजारात येत असतात. परंतु, जवळच रेल्वे स्टेशन, बाजार, पोलीस ठाणे आणि नेहमीच गजबजलेला शगून चौक असल्याने शेतकऱ्यांना माल विकायला ही जागा मिळत नाही. तसेच फुल विक्रेत्यांचा व्यवसाय हा प्रामुख्याने सकाळीच चालणारा असल्याने गर्दीमुळे त्यांचा व्यवसाय ही व्यवस्थित होत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बेभाव माल देऊन घरी जावे लागते. विक्रेत्यांचा माल विकला गेला नाहीतर त्यांना तो माल फेकून देण्याची वेळ येते. विक्रेत्यांना परवाने मिळूनही रस्त्यावरच माल विकावा लागतो.

यापूर्वी तत्कालीन महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी बाजाराची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांना क्रोमा शेजारी असणारी जागा 30 वर्षाच्या भाडेतत्वावर देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्याप अंमलबजावणी न झाल्याने फुलांचे व्यापारी अजय तापकीर व दत्तात्रय फुले यांनी महापौर राहुल जाधव यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी जागेअभावी उद्‌भवणाऱ्या समस्यांचा पाढा महापौरांसमोर वाचला. त्यावर महापौर जाधव यांनी येत्या दहा दिवसात हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)