फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस

केंद्राकडे पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

शिरवळ – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विचाराने मी मार्गक्रमण करीत असून नायगावच्या विकासासाठी शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे विचार जगामध्ये पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली असून त्याचा पाठपुरावा करत भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नायगाव येथे कौशल्य विकास योजनेला मंजुरी देत, पर्यटनाला चालना, सावित्री सृष्टी आयटीआय यासारखे प्रकल्प उभारणार असून खंडाळा तालुक्‍याचे नागरिकांचे स्वप्न असलेल्या मांढरदेव रस्त्याला मंजुरी देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत असे सांगताना नीरा देवघर कालव्यावरील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन तत्पर असून निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल कमी करत 19 टक्केच यापुढे भरावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे येथील भिडे वाड्याची पहिली शाळा पुननिर्माण करत राष्ट्रीय स्मारक उभारणार आहे. कटगुण येथील प्रस्तावही सादर केलेला मंजूर केला असून निधी कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नायगाव, ता. खंडाळा याठिकाणी सातारा जिल्हा परिषद, नायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे होते.

याप्रसंगी जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनीषा चौधरी, आमदार शंभूराज देसाई, आमदार छगन भुजबळ, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, नीता केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पिंपरी चिंचवड महापौर राहुल जाधव, कर्जत नगराध्यक्ष नामदेव राऊत, खंडाळा पंचायत समिती सभापती फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस मकरंद मोटे, जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, दिपाली साळुंखे, खंडाळा पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्रांताधिकारी संगीता चौगुले, गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसिलदार विवेक जाधव आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा भाग्याचा आणि अविस्मरणीय आहे. भारत देशामध्ये ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तन आणले. त्याचप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते जर नसते तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून होऊ शकला नसता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी समाजामध्ये सुधार काय असतो हे दाखवून दिले.

भारत देश हा त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी समाजाला वंचित ठेऊन 50 टक्के फळी असणाऱ्या महिला भगिनींना जगण्याचा अधिकार नाकारला व शिक्षणाचा अधिकार नाकारला. त्या समाजामध्ये जातीभेदाची मोठी फळी निर्माण करत समाजाला वंचित ठेवले. त्यावेळेस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी लढा उभारला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचे राज्य स्थापित करण्याचा निर्णय घेतला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला. सनातनवाद्यांकडून वाईट वागणूक मिळत असताना त्याची तमा न बाळगता खऱ्या अर्थाने पुरोगामित्व रुजवण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी केले.

छगन भुजबळ म्हणाले, नायगाव ही विचारांची खाण असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या कार्याची दखल घेत परदेशी नागरिक त्यांच्या जीवनावर अभ्यास करण्यासाठी येत असताना शासनाने या गोष्टीकडे लक्ष देत सर्व सुविधा पुरवण्यासाठी तत्पर राहणे आवश्‍यक आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे मनुवादाच्या विचारप्रणालीविरुद्ध कार्यरत होते. मात्र, ब्राम्हण समाजाविरुद्ध त्यांनी कधीही कार्य केले नाही म्हणून आजच्या शिक्षणाची खरी देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आहे.

आज पुन्हा मनुवाद पुढे येत असून विज्ञान पुढे जात असताना मनुवादाला थोपवण्याचे काम बहुजनांनी एकत्रित येऊन करणे आवश्‍यक असून त्यासाठी सर्वानी प्रमुख बनणे आवश्‍यक आहे. प्रा. कविता म्हेत्रे, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, नामदेव राऊत, सविता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे गौरी शिंदे यासह अनेक मुलींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन करत शिल्पश्रुष्टीची पाहणी केली. यावेळी निर्भया पथकाने त्याठिकाणी पथनाट्य सादर केले. यावेळी चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नायगाव ग्रामस्थांच्यावतीने सकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने सावित्रीच्या लेकी दर्शनासाठी जन्मभूमीमध्ये आल्याने नायगावला जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी सूत्रसंचालन दशरथ ननावरे, पोपट कासुर्डे यांनी केले तर प्रास्ताविक सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे , निखिल झगडे यांनी केले. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले.

खंडाळाकरांचे 39 वर्षाचे स्वप्न पूर्ण

खंडाळा तालुक्‍यातील शिरवळहून नायगाव, लोहोम, लिंबाचीवाडी मार्गे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई मंदिराकडे जाण्यासाठी गेल्या 39 वर्षांपासून खंडाळकर नागरिक शासनाकडे साद घालत होते. यासाठी खंडाळा पंचायत समितीचे पहिले सभापती दिवंगत लक्ष्मणराव भागुडे पाटील यांनी जीवापासून प्रयत्न करीत असताना आत्याच्या निधनानंतर सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीनकुमार भरगुडे पाटील यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना आदेश दिल्याने वडिलांचे व तालुक्‍यातील नागरिकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने पूर्ण केल्याचे समाधान कार्यक्रमस्थळी दिसून आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांढरदेव रस्त्याची मंजुरी देत असल्याची घोषणा करताच नितीन भरगुडे पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)