‘फुकट’चा शहाणपणा…

 

माणसाला काही गोष्टीचा अगदी मनापासून तिटकारा असतो… त्यातच एखादं ना आवडतं काम करावं लागलं तर मग मात्र ताळपायातील आग मस्तकात जाते… माणसाची विवेकबुद्धी नष्ट होऊन त्यातून ज्वालामुखी बाहेर पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही… विशेषत: नोकरी करताना घडणारे प्रसंग तर खूपच क्‍लेशदायक असतात. हे नोकरदारांना वेगळं सांगायला नकोच… हो ना ?

संध्याकाळचे सहा वाजले असतील. आज तसा दिवसभरात कामाचा रगाडा देखील खूप होता. एक एक काम संपवत संपवत घरी जायचे वेध लागले होते. तेवढ्यात मोबाइलची रिंग वाजली. “हेअर कम्स द पेन.’ बॉसचा फोन खणखणत होता. उचालावा की नको, अशी परिस्थिती… उचलून सांगावं, की नुकताच ऑफिसच्या बाहेर पडलोय किंवा बेस्ट ऑप्शन फोनच उचलू नये. अजूनही फोनची रिंग वाजताच होती.

हॅलोऽऽऽ तू कुठे आहेस, हे सांगूच नकोस. तडक ऑफिसमध्ये पोहोच. एक महत्त्वाचं काम आलय. जे आजच्या आज करून पाठवायचं आहे. कितीही उशीर झाला तरी… काही बोलायच्या आत तिकडून एवढं ऐकू आलं. खरंच, जेव्हा मला गडबड असते, तेव्हाच एवढं अर्जंट काम कसं येतं? हे खरंच आज पर्यंत न उलगडलेलं कोडं आहे; पण कुणाची तरी चाकरी करणाऱ्याने ते काम न ऐकून कसं चालेल! त्यावर एकच वाक्‍य तोंडातून बाहेर पडलं, “सर, मी आहे ऑफिसमध्येच…!’

शेवटच्या क्षणी आलेलं काम टाळणं त्यामानाने सोपं असतं; पण… नोकरीत एक अलिखित नियम आहे- कॉज बॉसला “नाही’ म्हणणं म्हणजे काय… हे सगळ्यांनाच माहीत आहे. बॉसनं काम सांगितलं- सगळं उसनं आवसान आणलं आणि घेतलं करायला काम. ऑफिसातला प्रत्येक जण त्याच्या परीनं टोमणा मारत, दु:ख व्यक्त करून घराची वाट धरत होता.

मेल चेक केला… आणि कपाळावर आठ्याच उमटल्या… एकदम एवढा प्रोजेक्‍ट… आणि उद्या प्रेझेंटेशन…. ते अख्खं आता बनवायचं…. जीव एकदम मेटाकुटीला आला… माझ्या भाषेत मी माझ्या भावना व्यक्त करायचा विचार केला, पण ऑफिसमध्ये त्या भावना व्यक्त करणं म्हणजे पुन्हा इकडे आड अन तिकडे विहीर…!

सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता… शेजारी असलेली पिण्याच्या पाण्याची बाटली उचलली आणि ढसाढसा रिकामी केली… आणि बसलो प्रेझेंटेशनच्या तयारीला… डोक्‍यातील प्रत्येक गोष्ट- “तुला कंटाळा आलाय’, असं बजावून सांगत होती. तरी काम तर करणं गरजेचं होतं. शेवटी एकदाचा श्रीगणेशा केलाच…!
आठच्या सुमारास बॉसचा फोन आला… फोन दिसत असून देखील कशाला उचला…. पुन्हा नवीन झंगाट मागं लावलं… त्यापेक्षा आहे एवढं काम बास आहे… कुठे यार घरी जायच्या वेळेस फुकटची दुखणी वाढवून घेऊ? तो फोन बिचारा ओरडत राहिला आणि बंद झाला.

रात्री 10 च्या ठोक्‍याला काम संपलं… बॉसला मेल टाकून दिला… “ऑल वर्क डन…’ रोज 7 ची “जय मल्हार’च्या वेळेत घरी जाणारा मी, आज “दिल दोस्ती दुनियादारी’च्या वेळेस उगवलो… घरात खेटरं काढत असताना पुन्हा एकदा मोबाइल वाजला… पुन्हा बॉसचा फोन… आता जर काही काम असेल तर…. विचारानं पछाडलं एकदम… काय दुखणं लावलं यार याने… अरे सॉरी… मघाशी तुला तुला फोन केला होता… पण तू उचालालाच नाहीस… त्या क्‍लायंटचा फोन आला होता… उद्याचं प्रेझेंटेशन कॅन्सल झालंय… आणि ते परवा आहे… तू घरी गेलास तरी चालेल… तेच सांगायला तुला फोन केला होता…
घ्या कपाळ माझं… स्वत:वरच चीड चीड केली… आणि काय मूर्खपणा केलाय फोन न उचलून ते कळालं…. आणि इथून पुढं कोणताच फोन उचलायचा हे आपण ठरवायचं नाही… येणारा प्रत्येक फोन उचलायचा हे एक मनाशी ठरवलं…
आणि लावला तिला फोन… तिकडून एकदमच फोन कट…. नंतर जेव्हा फोन पाहिला तेव्हा बॉसचा एकदा अन तिचे 10 वेळा फोन येऊन गेले होते… काय नशीब आहे…? एवढं म्हणालो… अन पांघरून डोक्‍यावर घेऊन गुपचूप झोपी गेलो.
– अदिती देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)