फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून 

सलामीच्या लढतीत यजमान रशिया विरुद्ध सौदी अरेबियाचे आव्हान 
मॉस्को – गेल्या चार वर्षांपासून जगभरातील फुटबॉलशौकीन वाट पाहात असलेल्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. यजमान रशिया विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यातील लढतीने स्पर्धेचे उद्‌घाटन होणार असून त्यानंतर 15 जुलैपर्यंत ब्राझिल, अर्जेंटिना, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन असे जगातील सर्वोत्तम 32 संघ आणि रोनाल्डो, मेस्सी, नेमार असे अव्वल खेळाडू विश्‍वकरंडकासाठी झुंज देणार आहेत. मॉस्कोतील लुझनिकी स्टेडियमवर उद्‌घाटनाची लढत रंगमार असून या स्टेडियमची आसनक्षमता 80 हजार आहे. विश्‍वक्रमवारीत 70व्या स्थानावर असलेल्या यजमान रशियासमोर 67व्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबियाविरुद्ध विजयी सलामी देण्याचे आव्हान आहे. या स्पर्धेसाठी रशियाने 13 अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च केला असून त्याच्या बदल्यात रशियन संघ किमान चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवार) इजिप्त विरुद्ध उरुग्वे, मोरोक्‍को विरुद्ध इराण आणि पोर्तुगाल विरुद्ध स्पेन अशा लढती रंगतील.

जगभरातून येणाऱ्या संघांचे, तसेच प्रेक्षकांचेही रशियन नागरिकांनी जोरदार स्वागत केल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर परदेशी संघांच्या सरावासाठीही शेकडो पाठीराखे गर्दी करीत आहेत. सोचीसारख्या चिमुकल्या गावातही ब्राझिलचा सराव पाहण्यासाठी पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आज सार्वजनिक सुटी जाहीर करून रशियन शासनाने सर्व नागरिकांना विश्‍वचषक स्पर्धेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

स्मोलोव्ह, झियुबा यांचे कम बॅक 
प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त झालेल्या यजमान रशियाने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी 23 खेळाडूंच्या संघात फयोडोर स्मोलोव्ह आणि आर्टेम झियुबा या अव्वल आक्रमक खेळाडूंचा समावेश केला आहे. यजमान रशियाने सर्वोत्तम संघ देण्याचा प्रयत्न केला असला, तरी बचावपटू जॉर्जी झिकिया, बचावपटू व्हिक्‍टर व्हेसिन आणि आघाडीवीर अलेक्‍झांडर व्हिक्‍टर कोकोरिन यांना दुखापती झाल्या असून गोलरक्षक अलेक्‍झांडर सेलिखोव्हच्या पोटरीचा स्नायू दुखावला असल्याने रशियाला जबर धक्‍का बसला आहे. अर्थात अव्वल मध्यरक्षक डेनिस चेरिसेव्हच्या पुनरागमनामुळे रशियाला दिलासा मिळाला असला, तरी तो खेळूनही रशियाला ऑस्ट्रियाविरुद्धच्या सराव सामन्यात 0-1 असा पराभव पत्करावा लागला. फिफा विश्‍वचषक स्पर्धेत रशियाची सलामीची लढत उद्या सौदी अरेबियाविरुद्ध रंगणार असून त्यांच्यासमोर 19 जून रोजी इजिप्तचे, तर 25 जून रोजी उरुग्वेचे आव्हान आहे.
प्रतिस्पर्धी संघ- 
रशिया– गोलरक्षक- इगोर अकिनफीव्ह, व्लादिमीर गॅबुलोव्ह व आन्द्रे लुनेव्ह, बचावपटू- व्लादिमीर ग्रॅनेट, फयोडोर कुद्रियाशोव्ह, इल्या कुटेपोव्ह, आन्द्रे सेम्योनोव्ह, इगोर स्मोल्निकोव्ह, मारिओ फर्नांडिस व सर्गेई इग्नाशेव्हिच, मध्यरक्षक- युरी गॅझिन्स्की, ऍलन झागोएव्ह, अलेक्‍झांडर गोलोविन, अलेक्‍झांडर एरोखिन, युरी झिर्कोव्ह, दलेर कुझियाएव्ह, रोमन झॉबनिन, अलेक्‍झांडर सॅमेदोव्ह, ऍन्टन मिरान्चुक व डेनिस चेरिशेव्ह, आघाडीवीर- आर्टेम झियुबा, अलेक्‍सी मिरान्चुक व फयोडोर स्मोलोव्ह.
सौदी अरेबिया– गोलरक्षक- मोहम्मद अल ओवैस, यासर अल मोसैलेम व अब्दुल्लाह अल मायूफ, बचावपटू- मन्सूर अल हारबी, महंमद अल ब्रेईक, यासिर अल शहरानी, मोताझ होसावी, ओसामा होसावी, ओमर होसावी व अली अल बुलैही, मध्यरक्षक- अब्दुल्लाह अल खैबरी, अब्दुल्लाह ओटायफ, याह्या अल शेहरी, तैसीर अल जस्सीम, हुसैन अल मोगाहवी, सलमान अल फराज, मोहम्मद कन्नो, सालेम अल दौसारी, फवाद अल मुवाल्लद, आघाडीवीर- मुहम्मद अल साहलावी व मुहम्मद अस्सिरी, प्रशिक्षक- पिझी युआन अन्टोनियो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)