फिफा विश्वचषक : मोरोक्‍कोशी बरोबरीमुळे स्पेन ब गटांत अग्रस्थानी 

बाद फेरीत रशियाचे आव्हान 
कॅलिनिनग्राड – मानवी चुका या खेळाचाच एक भाग असतात हे खरे असले, तरी पंचांच्या एका चुकीमुळे एखाद्या सामन्याचाच नव्हे तर स्पर्धेचाही निकाल बदलू शकतो. त्यामुळे फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या यंदाच्या सत्रापासून व्हिडीओ असिस्टेड रीव्ह्यू (व्हीएआर) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ पंचांना देण्यात आली. परिणामी अनेक सामन्यांचे निकाल बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्पेन विरुद्ध मोरोक्‍को या ब गटातील अखेरच्या गटसाखळी सामन्याबाबतही तसेच घडले. जादा वेळेत व्हिडीओ रीव्ह्यूच्या साहाय्याने पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे स्पेनला अत्यंत आवश्‍यक असलेली पेनल्टी किक मिळाली आणि लॅगो ऍस्पासने त्यावर अचूक लक्ष्यवेध करताना स्पेनला मोरोक्‍कोशी 2-2 अशी बरोबरी साधून दिली. या निकालामुळे स्पेनने सरस गोलफरकाच्या जोरावर ब गटातील अग्रस्थान निश्‍चित करीत बाद फेरी गाठली. आता उपउपान्त्यपूर्व फेरीत स्पेनसमोर यजमान रशियाचे कडवे आव्हान आहे. मॉस्को येथे ही लढत होणार असून गटातील उपविजेत्या पोर्तुगालसमोर बाद फेरीत उरुग्वेचे आव्हान आहे.

त्याआधी आन्द्रेस इनिएस्टा आणि सर्जिओ रॅमोस यांच्यातील गोंधळामुळे मोरोक्‍कोला विश्‍वचषक स्पर्धेतील पहिलावहिला गोल करण्याची संधी मिळाली. इनिएस्टा व रॅमोस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे मिळालेल्या सोप्या चेंडूवर खालिद बाऊतैबने मोरोक्‍कोचे खाते उघडले. मात्र त्यांना ही आघाडी टिकविता आली नाही. 19व्या मिनिटाला इस्कोने इनिएस्टाच्या पासवर स्पेनला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे मोरोक्‍कोच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावल्यास नवल नव्हतेच. मध्यंतराला 1-1 अशी बरोबरी कायम राहिली. मात्र उत्तरार्धात कोणताही संघ खऱ्या अर्थाने गोल करण्याच्या जवळपास पोहोचत नव्हता. अखेर 81व्या मिनिटाला स्पेनच्या बचावफळीच्या चुकीमुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत मोरोक्‍कोचा आघाडीवीर युसूफ एल नेसयरीने फायल फैरच्या पासवर लक्ष्यवेध केला. या गोलमुळे 2-1 अशी आघाडी घेणाऱ्या मोरोक्‍को संघाला स्पेनवरील विजयाची स्वप्ने पडू लागल्याची कबुली मोरोक्‍कोचे प्रशिक्षक हर्व्ह रेनार्ड यांनी दिली. परंतु तसे घडायचे नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंजुरी टाईममधील पहिल्याच मिनिटाला बदली खेळाडू लॅगो ऍस्पासने डॅनियल कार्व्हाजालच्या पासवर स्पेनला बरोबरी साधून देणारा गोल केला. या वेळीही कार्व्हाजालने दिलेला पास ऑफसाईड ठरविण्यात आला होता. परंतु तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ रीव्ह्यूचा आधार घेतल्यावर मैदानावरील पंचांचा निर्णय रद्द केला. हा गोल वैध ठरल्याचे पाहून दोन्ही संघांमधील खेळाडूंनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिल्या.

स्पेनवरील विजय हुकल्याची खंत 
स्पेनसारख्या अव्वल दर्जाच्या संघावर विजय मिळविण्याची संधी हुकल्याबद्दल खंत वाटत असल्याचे मोरोक्‍कोचे प्रशिक्षक हर्व्ह रेनार्ड यांनी सांगितले. परंतु त्यांनी बरोबरी साधल्याचे श्रेयही स्पेनला दिलवा. स्पेनच्या संघाकडे पाहिल्यास त्यात रिअल माद्रिद आणि बार्सिलोना या संघांमधील खेळाडूंचा भरणा दिसतो. हे सर्वजण महान खेळाडू आहेत आणि त्यांना बरोबरीत रोखता येणे हीसुद्धा उत्तम कामगिरी आहे, असे त्यांनी सांगितले. स्पेन संघाने सलग 23व्या सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. परंतु साखळी फेरीतील त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याची कबुली मध्यरक्षक इस्कोने दिली आहे. मोरोक्‍कोसारख्या संघाला विश्‍वचषकातील पहिला गोल करण्याची संधी आम्ही दिली. माझ्या मते हे आमचे अपयशच होते. बाद पेरीत आम्हाला अधिख चांगली कामगिरी करावी लागणार आहे, असे त्याने नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)