फिनोलेक्‍स केबल्सचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

पिंपरी – फिनोलेक्‍स केबल्स कंपनी व्यवस्थापन व कामगारांकडून साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून ओळखला जात आहे. गणेशमूर्तीचे कंपनी परिसरातील विहिरीत विसर्जन करत असल्याने पर्यावरणाविषयी कंपनी व्यवस्थापनाकडून किती खबरदारी घेतली जात आहे, हेच याचे द्योतक आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत मोरवाडी येथे असलेल्या फिनोलेक्‍स केबल्स कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याकरिता कंपनीच्या प्रशासन व मनुष्यबळ विभागाकडून पुढाकार घेतला जात आहे. कंपनीच्या कॅन्टीनच्या भव्य हॉलमध्ये गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. कॅन्टीनच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षक मांडव टाकण्यात आला आहे. दररोज सकाळ-सायंकाळ गणरायाची मनोभावे पुजा-अर्चा केली जात आहे. या आनंद सोहळ्यामुळे सर्व कामगार व अधिकारी एकत्र येत असल्याने यामुळे त्यांच्यातील सांघिक भावना दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत प्रशासन विभागप्रमुख नीरंज कुंडले यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा सर्व खर्च व्यवस्थापनाकडून केला जातो. बाप्पाचे आगमन सर्वांनाच सुखावणारे असून, या काळात विविध विभागप्रमुखांच्या हस्ते गणरायाची आरती केली जात आहे. यंदा बाप्पाचा कंपनीत बारा दिवस मुक्काम आहे. मूर्तीजवळ थर्माकॉलच्या माध्यमातून अष्टविनायक साकारण्यात आले असून, देखाव्यावर भर न देता हाच देखावा सादर करुन कंपनीच्या वतीने सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला जातो. कंपनीत दरवर्षी मोठ्या उत्साहात राष्ट्रीय सण साजरे केले जातात. स्वातंत्र्य दिनी कामगार व अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जाते. खंडेनवमीनिमित्त कंपनीतील सर्वांना मिठाईचे वाटप केले जाते. याशिवाय दरवर्षी न चुकता जागतिक अपंग दिनानिमित्त चतु:श्रुंगी येथील बालकल्याण संस्थेच्या अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी बसची नि:शुल्क सुविधा पुरविली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)