फिटनेसच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट!

  • ठेकेदारांची मुजोरी ः आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली दखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील महिलांना चारचाकी हलके वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी ठेकेदारांकडून “मेडिकल फिटनेस’ प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली प्रति लाभार्थी 150 रुपये अतिरिक्‍त शुल्क उकळण्यात येत आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र एक हजार 744 लाभार्थ्यांकडून हे शुल्क आकारण्यात येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदारांकडून आर्थिक लुटमार सुरू आहे. यापुढे लाभार्थ्यांच्या सोयीसाठी महापालिकेच्या रुग्णालयांतून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची निशुल्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत 22 ते 45 वयोगटातील महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. चालू वर्षात लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले. त्यावर सात हजार 700 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील 1 हजार 744 अर्जदार पात्र ठरले. तर, उर्वरीत पाच हजार 956 लाभार्थ्यांना योग्य कागदपत्रांअभावी अपात्र घोषीत केले. पात्र 1 हजार 744 लाभार्थ्यांची विभागणी करून थेरगाव येथील मे. साईराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल या ठेकेदार संस्थेकडे 860 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर, मे. महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. या ठेकेदार संस्थेकडे 840 लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यासाठी प्रती लाभार्थ्यांमागे महापालिका 4 हजार 380 रुपये खर्च करत आहे. प्रशिक्षणांतर्गत लाभार्थी महिलेला उपप्रादेशिक परिवहन प्रशासनाकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देण्यात येणार आहे. त्याकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्याच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून 150 रुपये अतिरिक्त शुल्क ठेकेदार आकारत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या ठरावात महिलांना वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अटी व शर्तींत त्रुटी असल्याने लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. शहरात महापालिकेचे 16 रुग्णालये आहेत. त्यातून निशूल्क वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची अट देण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना खासगी रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 150 रुपये शूल्क आकारले जात आहेत. त्यामुळे मोफत प्रशिक्षणाच्या नावाखाली लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. आजअखेर 12 महिला लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यात मे. साईराज ड्रायव्हिंग स्कूलच्या 10 महिला आणि महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.च्या 2 महिलांचा समावेश आहे.

प्रशिक्षणार्थी महिलांची वयोमर्यादा 22 ते 45 असल्याने 35 ते 40 वयोमर्यादेतील बहुतांश महिला संगणक हाताळण्यात निरक्षर आहेत. त्यांना उपप्रादेशिक परिवहन प्रशासनाची परिक्षा पास होणे कठीण जात आहे. एकदा परिक्षेत फेल ठरल्यानंतर दुसऱ्यांदा प्रशिक्षण घेण्यासाठी पदर शुल्क भरावे लागतात. त्यामुळे स्वतः शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करण्याची बहुतांश महिला लाभार्थ्यांची तयारी नाही. जरी काही महिलांनी तयारी दर्षविली आणि त्यानंतरही त्या परिक्षेत फेल ठरल्या तर त्याचा भुर्दंड ठेकेदाराला बसतो. वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी लाभार्थी महिलेवर बंधन नाही. त्यांनी कोणत्याही रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र काढून आणल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु, वैद्यकीय प्रमाणपत्र वाहन चालविण्याचा परवाना घेण्यास आवश्‍यक आहे, असे ठेकेदार विशाल पवार यांनी सांगितले.

…तर ठेकेदाराचे काम काढले जाईल
वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी 150 रुपये शूल्क आकारणे बेकायदेशीर आहे. त्याबाबत संबंधित ठेकेदारांना आदेश देण्यात आले आहेत. जर हा प्रकार नाही थांबला, तर ठेकेदाराचे काम काढून घेण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे. तसेच, यापुढे लाभार्थी महिलेला वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्याची सुविधा महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेला केवळ प्रवासाचे शूल्क बसणार आहेत, असा निर्णय आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितली.

लाभार्थी महिलांकडून कोणतेही शूल्क आकारण्याचे अधिकार ठेकेदारांना नाहीत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नियंत्रणात याबाबत बैठक झाली. संबंधित ठेकेदारांना तशा सूचना दिल्या आहेत. यापुढे पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात लाभार्थी महिलांना वैद्यकीय प्रमाणपत्र निशूल्क देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना पत्र देण्यात आले आहे.
– स्मिता झगडे, सहायक आयुक्‍त.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)