फाशीच्या स्थगितीमुळे पाक नेत्यांची शरीफ सरकारवर टीका

इस्लामाबाद – भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याचे पाकिस्तानात जोरदार पडसाद उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरु असताना पाकिस्तानातील कायदेपंडितांनी जाधव यांच्या फाशीचा विषय आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे चित्र तेथील जनतेसमोर निर्माण केले होते.

पण प्रत्यक्षात आदेश विरोधात गेल्यानंतर तिथल्या राजकीय नेत्यांनी, कायदेपंडितांनी नवाझ शरीफ सरकारवर टीका सुरु केली आहे. जाधव यांच्या शिक्षेचा विषय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेत येत नाही असे आपले म्हणणे होते मग, आपण आंतरराष्ट्रीय कोर्टात का गेलो ? आपणच आपल्या पायावर कु-हाड मारुन घेतली आहे अशी प्रतिक्रिया निवृत्त पाकिस्तानी न्यायाधीश शाईक उस्मानी यांनी डॉन न्यूजला दिली. आंतरराष्ट्रीय कोर्ट अंतिम निकाल देत नाही तो पर्यंत पाकिस्तानात न्यायालयीन प्रक्रिया सुरु राहील. स्थगिती आदेश असेपर्यंत आता जाधव यांना फाशी देता येणार नाही असे उस्मानी म्हणाले. पाकिस्तानला आपली बाजू मांडण्यासाठी 90 मिनिटांचा जो वेळ मिळाला होता त्याचा पाकिस्तानने पुरेपूर वापर केला नाही. पाकिस्तानने या खटल्याची व्यवस्थित तयारी केली नव्हती. पाकिस्तानकडे 90 मिनिटांचा वेळ होता. पण पाकिस्तानने आपल्या वाटयाची 40 मिनिटे वाया घालवली. आपण इतक्‍या कमी वेळात आपला युक्तीवाद संपवला त्याचे मला आश्‍चर्य वाटते असे लंडनस्थित पाकिस्तानी बॅरिस्टर राशिद उस्लम यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)