फार्म हाऊस घेताना…

फार्म हाऊस खरेदी करताना ते घेण्यामागे नेमका हेतू कोणता, हे स्पष्ट असायला हवे. वीकेन्डला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठीच केवळ आपण फार्म हाऊस खरेदी करतो आहोत की त्यामागे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा हेतू आहे, हे स्पष्ट असले पाहिजे. भविष्यासाठी गुंतवणूक हाही हेतू फार्म हाऊसच्या खरेदीमागे असू शकतो. हेतू निश्‍चित करणे महत्त्वाचे असण्याचे कारण असे की, फार्म हाऊसच्या खरेदीची पूर्ण प्रक्रियाच त्यावर अवलंबून असते. आपल्या मनात हेतू सुस्पष्ट असल्यास संपूर्ण प्रक्रिया सोपी होते.

हळूहळू शेती हाच आपला प्रमुख उत्पन्न स्रोत बनवावा, या हेतूनेही अनेकजण फार्म हाऊस खरेदी करतात. अर्थात निसर्गाच्या कुशीत राहण्याची मजाही औरच असते. प्रदूषणविरहित वातावरण हे अशा ठिकाणचे वैशिष्ट्य आणि बलस्थान असते. अर्थात, भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून ज्यांना फार्म हाऊस खरेदी करायचे आहे, त्यांच्या दृष्टीने भविष्यात घराच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. फार्म हाऊसचा शोध घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या बजेटचा अंदाज सर्वप्रथम घ्यायला हवा. या बाबतीत स्पष्टता नसल्यास आपण वेळ आणि पैसा वाया घालवतो आहोत, असाच अर्थ होईल.

शोध घेताना प्लॉटचा आकार हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, किंमत ठरण्याचे ते एकमेव कारण नव्हे. मातीची प्रत, भौगोलिक स्थिती, परिसरातील हवामान, हिमवृष्टी किंवा पुराची शक्‍यता, संपर्काचे मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांची जवळपास असलेली उपलब्धता अशा अनेक घटकांवर फार्म हाऊसची किंमत ठरते. या सर्व कारणांचा अभ्यास करून त्यावर विचार करणे हिताचे ठरते. यापैकी कोणते कारण आपण फार्म हाऊस खरेदी करण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, हे ठरवून घ्यावे. काही कारणे आपण खरेदीचा निर्णय घेताना वगळूही शकतो किंवा त्या कारणांसाठी तडजोड करू शकतो. या कारणांचा विचारच फार्म हाऊस खरेदी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरेल की नुकसानीचा, हे ठरवितात.

ज्या कारणासाठी आपण फार्म हाऊस खरेदी करीत आहोत, त्या फार्म हाऊसचा प्रकार, आकार आणि स्थिती आपल्या गरजेनुसार असणे आवश्‍यक आहे. या कारणांचा प्रभाव किमतीवरही असणे आवश्‍यक आहे. अर्थात, फार्म हाऊसमध्ये आपल्या गरजेनुसार बदल करणे किंवा डिझाइन बदलणेही शक्‍य असते, हेही ध्यानात घेतले पाहिजे. एकदा फार्म हाऊसची निवड झाली की, सौदा पूर्ण करण्यासाठी पैशांचा बंदोबस्त करण्याच्या कामाला लागावे. फार्म हाऊसच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली तरी निम्मेच काम पूर्ण झालेले असते. कारण खरेदीनंतर फार्म हाऊसचा उचित विमा उतरविणेही आवश्‍यक असते. फार्म हाऊस ही सामान्यतः एक मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे आपला जो पैसा फार्म हाऊसच्या खरेदीत गुंतला आहे, त्यामुळे जोखीमही वाढली आहे, याची जाणीव असायला हवी. त्यामुळे जितक्‍या उत्तम अटी आणि शर्तींचा विमा घेता येईल, तेवढा फार्म हाऊसचा घ्यावा. जे लोक फार्म हाऊसच्या खरेदीसाठी कर्ज घेतात, त्यांना तर बॅंकेचा नियम म्हणून विमा घ्यावाच लागतो.

– अवंती कारखानीस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)