फायबरयुक्‍त पदार्थांचा आहारात समावेश हवाच

file photo

नेक कामांच्या व्यापात पटकन शिजवता येणारा पांढरा भात, दुकानातून आणलेला कामचलाऊ पांढरा ब्रेड किंवा थेट हॉटेलमधून पार्सल आणलेली तंदुरी रोटी हे तसे महिलावर्गाचे आवडते पदार्थ. घाईच्या वेळेत काम चालवून नेणाऱ्या या पदार्थांमधली कमकुवत बाजू म्हणजे यात असलेली तंतूमय पदार्थांची अर्थात फायबरची कमतरता.

आपल्या आहारात भाज्या, पालेभाज्या, फळं, धान्यं आणि कडधान्यं असतात. यातील काही भाग हा तंतूमय पदार्थांचा असतो. तसंच, काही पदार्थांत जास्तीत जास्त प्रमाणात तंतूमय पदार्थच असतात. उदा. गव्हाचा कोंडा! त्याचं रूपरंग पाहून आपण ते बऱ्याचदा खात नाही; पण ते आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारक असतं.

हे फायबर दोन प्रकारचं असतं. विरघळणारे आणि न विरघळणारे! न विरघळणारे फायबर न पचता तसंच बाहेर पडतं, तर विरघळणारं फायबर पोटात पाणी शोषून घेतात. न विरघळणारं फायबर आपल्याला कोंडा, खाता येण्यासारखी फळांची सालं, भाज्या आणि सुका मेवा, तेलबिया यातून मिळतात. विरघळणारे फायबर आपल्याला पपई, संत्रं, पेरू यासारखी फळं, ओट्‌स आणि सोयाबीनचे पदार्थ यातून मिळतात.

फास्ट फूड पदार्थांतून आपल्याला बिलकुल फायबर मिळत नाही. म्हणूनच ते शरीराला चांगले नसतात. ज्या पदार्थातील तंतूमय भाग काढून टाकलेले असतात ते फार पटकन पचतात. रक्‍तातली साखर लवकर वाढवतात आणि त्यामुळे वजनही वाढतं. याउलट जास्त फायबर असणारे पदार्थ हळूहळू पचतात आणि त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. याचाच अर्थ असा की फायबर जास्त समाधान देतात आणि कॅलरीजची काळजी करणाऱ्या लोकांसाठी चांगले असतात.

फायबरचे फायदे
पोट लवकर भरतं आणि समाधानही मिळतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला याची मदत होते.
पोट साफ होते (कुठलीही पाचके घेण्याची गरज राहात नाही)
आपल्या शरीरात प्रदूषण आणि फास्ट फूड तसंच इतर रासायनिक पदार्थ अनेक मार्गांनी प्रवेश करत असतात. त्यातील अनेक घटक कर्करोगाला कारणीभूत ठरत असतात. फायबरमुळे हे हानिकारक घटक शहरातून लवकर बाहेर हाकलले जातात आणि त्यांच्या वाईट परिणामांची तीव्रता कमी होते.
विरघळणारे फायबर रक्‍तातील कॉलेस्ट्रॉलसारख्या घटकांना बांधून घेतं आणि शरीराबाहेर टाकलं जातात. त्यामुळे रक्‍तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

मधुमेहीसाठी रक्‍तातील साखरेची पातळी नॉर्मल राहण्यासाठी तंतूमय पदार्थांचा फार उपयोग होतो.
फायबर कितीही चांगलं असलं तरी ते आहारात एकदम वाढवू नये, तर हळूहळू वाढवावे. तंतूमय पदार्थ एकदम जास्त प्रमाणात खायला सुरुवात केली, तर पोट बिघडू शकतं. त्याचा अतिरेक झाल्यास शरीराला आवश्‍यक असणाऱ्या झिंक, कॅल्शियम, लोह अशा क्षारांची कमतरता निर्माण होऊ शकते.

आहारातील फायबर कसे वाढवाल ?
सालं काढून फळं खाण्याची सवय लावून घेऊ नये. (अगदी लहान असताना ठीक आहे)
फळं, भाज्या आणि सुका मेवा उदा. अंजीर, मनुका आवर्जून खा.
ज्या फळांची आणि भाज्याची साले खाता येतात, ते जरूर सालांसकट खावेत. उदा. सफरचंद, बटाटा वगैरे.
कच्च्या कोशिंबिरी आणि फळं यांचा आहारात समावेश असावा.
धान्यं , कडधान्यं खावीत.
पांढरा भात आणि पांढरा ब्रेड यापेक्षा ब्राउन राइस आणि ब्राउन ब्रेड वापरावा.
हे सर्व करताना भरपूर पाणी प्यावं म्हणजे खाल्लेल्या तंतूमय पदार्थांचा नीट उपयोग होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)