फादर्स डे – एक दिवस वडिलांसाठी!

आज फादर्स डे आहे. आता हे फादर्स डे, मदर्स डे, ब्रदर्स डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे सारा परदेशातून आयात केलेला माल. वर्षातला फक्त एक दिवस त्यांच्या नावाने साजरा केला की झाले. बाकी 364 दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला मोकळे. एक दिवस सण, बाकी वर्षभर शिमगा; असा हा प्रकार. असो! काळ बदलतो आहे. आपण जगाला बदलू शकत नाही, स्वत:लाही बदलणे पटत नाही आणि शक्‍यही नाही, तर मग गप्प बसणे एवढा एकच उपाय शिल्लक राहतो. तुका म्हणे उगा राही, जे जे होईल ते ते पाही असे काहीतरी म्हणतात ना, तसा हा प्रकार आहे. जाऊ द्या.
आपला आजचा विषय आहे, फादर्स डे. आज फादर्स डे म्हटल्यावर मनात किती तरी आठवणी जाग्या होतात. विशेषत: आपल्या लहानपणच्या. काही महिन्यांपूर्वी माझ्या एका फ्रेंडने एक लेख मला वाचायला दिला होता. लेख म्हणजे झेरॉक्‍सच होती. पण लेख छान होता. मला खूप आवडला तो. तो मी जपूनही ठेवला होता, कितीतरी महिने. मग कोठे गायब झाला देव जाणे. माझ्या मेव्हण्याला मी तो वाचायला दिला होता. त्याने तो वाचला आणि म्हणाला, दाजी, वडिलांबद्दल असे काही लिहिलेले मी पहिल्यांदाच वाचतोय. हे सारे वाचून डोळ्यात पाणी आले माझ्या. खरोखरच वडिलांची किंमत आपल्याला कळत नाही हेच खरे. प्रेमस्वरूप आई, स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी, जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गादपि… वगैरे घोष लावला जातो. आईची माया, ममता यांचा उदो उदो केला जातो, पण आयुष्यभर पहाडासारखा पाठीमागे उभा राहणारा बाप मात्र समोर असेपर्यंत दिसत नाही कोणालाच. प्रसंगी स्वत: हाल काढून कुटुंबातील सर्वांना, विशेषत: मुलांना फुलासारखे जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाची किंमत तो गेल्यावरच कळते. तोपर्यंत नाही, हे तर सत्यच आहे. वडील समोर असताना त्यांच्याबद्दल फारशी ममता वाटत नाही. सारी माया ममता हे प्रेमस्वरूप आईच्या वाटाल्या जाते. वडील बिचारे घरात असूनही नसल्यासारखेच असतात. समोर असताना त्यांचे महत्त्व कळले नाही, तरी ते नसतानाच त्याची किंमत कळते, उणीव बोचते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
मुलांच्या बाबतीत सामान्यत: बापाबद्दल घरात भीती निर्माण करण्याचाच प्रकार चालतो. बापाचा नुसता बागुलबुवा केला जातो. हे करू नकोस बाबा रागावतील, तिकडे जाऊ नकोस बाबा रागावतील, अभ्यास कर नाही तर बाबा रागवतील….. या “अमूक केले नाही तर बाबा रागावतील’च्या जपाने नाही म्हटले तरी मुलांच्या मनात कळत न कळत बाबांबद्दल एक प्रकारची दहशतच बसते आणि या दहशतीपुढे त्यांची मूक माया दिसतच नाही. अनेक घरात बाप म्हणजे केवळ पैसे पुरविण्याचे-गरजा पूर्ण करण्याचे-कोडकौतुक करून घेण्याचे एक यंत्रच समजले जाते. बाबा म्हणजे सकाळी लवकर उठून बाहेर जाणारे, रात्री उशिरा घरी येणारे, कुरकूर न करता राब राब राबणारे एक यंत्र. आपले मन मारून जगणारे यंत्रच. मुळात त्याला मन असते याची जाणीवच कोणाला नसते. मग त्या मनाचा विचार कोठून असणार.
बाबाला कोणी दुधावरची साय म्हणत नाहीत, लंगड्याचा पाय म्हणत नाहीत, वासराची गाय म्हणत नाहीत. पायाला ठेच लागली तर आई गं म्हणतात. फक्त मोठे संकट आले, भीती वाटली की आपल्याला रक्षणकर्त्या बाबांची आठवण येते आणि मग आपण म्हणतो, “बाप रे!’ बाकी वडिलांची आठवण कोणाला येत नाही. अगदी साने गुरुजींनाही श्‍यामचा बाप दिसला नाही. श्‍यामची आईच दिसली आणि ती सगळ्यांनी डोक्‍यावर घेतली. आजही घेत आहेत. मुले शपथही आईची घेतात, बाबांची नाही. खरं सांगायचं तर आता आईची काय आणि बाबांची काय, शपथच कोणी घेत नाही. शपथेवर विश्‍वासच राहिलेला नाही कोणाचा. घेणाऱ्याचा नाही, आणि ऐकणाऱ्याचाही नाही.
खरं म्हणजे बाप हा शहाळ्यासारखा असतो. वरून कितीही कठोर दिसला, तरी आतमध्ये नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. संस्कार देणारी आई असेल, पण ते संस्कार जपणारा-त्यांना संरक्षण देणारा मात्र बाप असतो. आई संयम देणारी असली, तर खंबीरपणा देणारा बाप असतो.
कन्या ही परक्‍याचे धन आहे हे माहीत असूनही तिला फुलासारखी जपणारा-जपण्याचा सर्वस्वी प्रयत्न करणारा बापच असतो. तो प्रसंगी रागावतो, कठोर होतो, पण ते मुलीच्या भल्यासाठीच. 20-22 वर्षे जीवापाड जपलेल्या मुलीचा हात तिच्या पतीच्या हाती देताना ज्याचे काळीज तुटते, पण जो डोळ्यात पाण्याचा थेंबही न आणता तिला केविलवाण्या हसतमुखाने निरोप देत डोळ्यातील अश्रू आतल्या आत दाबतो. तो बाप असतो. आई आपल्या भावनांना वाट करून देत असते, मोकळेपणाने टाहो फोडत असते, आजूबाजूचे सगळे तिला समजावत असतात आणि बाप मात्र एकटाच बाजूला उभा असतो. मुलीच्या पाठीवरून नि:शब्द हात फिरवीत. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा, असे मूकपणे केवळ स्पर्शातून बोलत असतो.
अशा घरात असूनही नसल्यासारख्या असणाऱ्या बापासाठी आजचा फादर्स डे साजरा करू या. (असे वर्षाचे 365 दिवस म्हणा)
बाळ शिवाजी शेवाडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)