फाटकी नोंदवही, अर्धवट तक्रारी आणि पालकांची गर्दी..!

जिल्हा परिषदमध्ये आरटीई प्रवेशाचा सावळा गोंधळ


आरटीईच्या पाचशे तक्रारी


फोनवरुन दीडशे तर मेलवर तीनशे ते साडेतीनशे तक्रारी

पुणे – राज्यभरातून आरटीईच्या किती तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त झाल्या असा प्रश्‍न जर पुणे जिल्हा परिषदेत जाऊन विचारला तर त्यांना तो निश्‍चितपणे देता येईलच असे नाही. कारण आरटीईसाठी राज्यभरासाठी जी हेल्पलाईन दिली आहे त्या हेल्पलाईनवरील तक्रार एका फाटक्‍या वहित लिहून घेतल्या जात आहे. याला ना कोणते नंबरिंग आहे, ना एक विशिष्ट धाचा, काही काही पालकांचे तर पुर्ण नावही लिहिलेले नाही. ना त्यांच्या अर्ज क्रमांकाची नोंद, ना पत्ता, ना शाळेचे नाव अशी कोणतीही माहिती त्यात नाही. एखादी रफ वही वाटावी त्यापेक्षाही वाईट वहीमध्ये सध्या आरटीईच्या तक्रारींची नोंद केली जात आहे.

राज्यात सध्या आरटीई प्रवेशाची पहिल्या फेरीतील प्रवेश सुरु आहेत. या प्रवेशादरम्यान अनेक शाळा राज्य शासनाने तीन जणांची समिती स्थापन करत राज्य पातळीवर हेल्पलाईन तयार केली आहे. या हेल्पलाईनसाठी देण्यात आलेला क्रमांक हा पुणे जिल्हा परिषदेचा आहे. जिल्हा परिषदेत मात्र या तक्रारी नीट नोंदवूनच घेतल्या जात नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या एकूणच प्रकरणाबाबत शिक्षण आयुक्‍त विपीन शर्मा व शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

आम्ही सगळ्या नोंदी लिहून घेतो. आरटीईच्या तक्रारींची नोंदवहीची फाटलेली पानं चिकटवली जातील. पालकांचे अर्ज क्रमांकही आता इथून पुढे लिहून घेतले जातील. ज्या शाळा न्यायालयात गेल्या आहेत त्या शाळातील पालकांनी घाबरु नये त्यांचे प्रवेश राखून ठेवले जातील. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी 24 मार्चनंतर मुदतवाढ मिळणार आहे.
शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा

जिल्हा परिषदेतील लपवाछपवी
आरटीई प्रवेशाच्या फोनवरुन किती तक्रारी आल्या असा प्रश्‍न फोन ऑपरेटरला विचारला असता त्याने मोजणी करुन साधारण 140 तक्रारी असल्याचे सांगितले. तर हाच प्रश्‍न शिक्षणाधिकारी दराडे यांना विचारला असता, पंचवीस एक तक्रारी आल्या असतील असे त्यांनी सांगितले. तर पत्रकारांसमोर आरटीईबाबत चर्चा सुरु असताना फाईलवर सही घेण्यासाठी आलेले कर्मचारी मधेच बोलून गेले की, “”अहो, काय सांगणार रोज दीडशे पालक इथे कार्यालयात येतात.” यावरुनच शिक्षण विभागात नेमका चालणारा सावळा गोंधळ किंवा लपवा छपवी कशी चालते हे यावरुन स्पष्ट झाले.

शिक्षण आयुक्‍त असून नसून सारखेच..!
तत्कालीन शिक्षण आयुक्‍त एस.चोक्‍कलिंगम यांनी आरटीई प्रवेशाची घडी अत्यंत उत्तम बसवली. ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्या त्या वेळी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या सोडविल्या देखील, मात्र सध्याचे आयुक्‍त असले काय नि नसले काय सारखेच आहे. रोज इथे अनेक पालक लहान मुलांना घेऊन प्रवेशाच्या तक्रारी घेऊन येतात मात्र त्या सोडविल्या जात नाहीत. चोक्‍कलिंगम साहेब स्वत: हे सोडवत होते, अधिकाऱ्यांकडून कामे करुन घेत होते अशी चर्चा सध्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

प्रसंग एक
सातारामधील पालक – आम्हाला आरटीईचे प्रवेशासाठी इकडे पाठवले आहे. आमच्या पाल्याचा नंबर लागूनसुध्दा प्रवेश मिळाला नाही.
जिल्हा परिषदेतील कर्मचारी – कोणी पाठवलं तुम्हाला इकडे. तिकडेच काम व्हायला हवं तुमचं.
पालक – सातारामधूनच आम्हाला इकडे पाठवलं.
कर्मचारी – इकडे काही होत नाही हो, तुमचा लॉग इन इकडे पहाता येणार नाही तो एनआयसीला असतो तिकडे जा.
पालक – अहो, पण आत्ताच आम्ही सेन्ट्रल बिल्डिंगला जाऊन आलो, त्यांनी इकडे सांगितले.
कर्मचारी – नाही हो, इकडे काही नाही होणार, एनआयसीला किंवा सातारच्या ऑफिसला जा

प्रसंग दोन
अपंग पालक – माझा नातेवाईकांचा मुलगा बुलढाण्यातील आहे त्यांना शाळा आरटीई प्रवेश देत नाहीत
कर्मचारी – त्या समोरच्या व्यक्‍तीला जाऊन भेटा
अपंग पालक – (भेटून आल्यानंतर) नाही, ते म्हणतायेत इथे काही होणार नाही
कर्मचारी – तुम्ही तिकडे बुलढाण्यालाच सांगितले पाहिजे, इथे तुमचा लॉग इन टाकून पहायची काही सिस्टिम नाही
अपंग पालक – तुम्ही शाळेतच जाऊन भेटा आणि त्यांना सांगा तुम्हाला प्रवेश द्यायलाच हवा

पुणे जिल्हा आकडेवारी
आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागा – 16422
आरटीईसाठी आलेले अर्ज – 42108
पहिल्या फेरीत लॉटरीत नाव आलेले विद्यार्थी – 10,228
आतापर्यंत शाळेत झालेले प्रत्यक्ष प्रवेश – 2674
राज्यातून दूरध्वनीवरुन आलेल्या तक्रारी – 140
राज्यातून लेखी आलेल्या तक्रारी – 300 ते 350

राज्यभरासाठी हेल्पलाईन
020- 26114525
rtemh2018@gmail.com


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)