फसवणूक प्रकरणात बिल्डरला पोलीस कोठडी

पुणे – प्रकल्पाला 11 मजल्यांची परवानगी असल्याचे खोटे कागदपत्र दाखवून, एका फ्लॅट तीन जणांना विक्रीकरून फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकाची 66 लाख 85 हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला चतुःश्रृंगी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
दीपक यशवंत पाटील (वय 52, रा. कोथरूड) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी हरिंदर पालसिंग आंनद (वय 58, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 2012 ते आजपर्यंतच्या कालावधीत घडली. पाटील यांचा बाणेर येथे प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाला सात मजल्यांची परवानगी आहे. मात्र, पाटील याने खोटे कागदपत्र तयार करून 11 मजल्याची परवनागी असल्याचे दाखवत आनंद यांना 10 व्या मजल्यावर फ्लॅट बुक करण्यास भाग पाडले. त्यावेळी पाटील यांनी आनंद यांच्याकडून 66 लाख 85 हजार 231 रूपये घेतले. खरेदीखत ही केले. मात्र, हा प्रकल्प अद्याप पुर्ण झाला नसून, आनंद यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही. तर वाटप पत्राद्वारे हा फ्लॅट दुसऱ्यालाच देण्यात आला. इतके करूनही न थांबता या फ्लॅटवर सहकारी पतसंस्थेतून कर्ज घेत आनंद यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक करून पाटील याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पाटील याने अनेक लोकांची, बॅंकेची, पतसंस्थेची फसवणूक केल्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पासाठी कोणत्या परवानग्या घेतल्या आहेत?, आरोपीने हा फ्लॅट नक्की आणखी किती लोकांना विकला आहे?, या फ्लॅटवर किती कर्ज घेतले आहे?, 11 व्या मजल्याची परवानगी असल्याचे बनावट नकाशे कोठे तयार केले, याबाबत तपास करण्यासाठी, गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)