फसवणूकप्रकरणी पोलीस कोठडी

पुणे – व्यवसायात पैसे गुंतवायचे आहेत, असे सांगून 3 कोटी 46 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला 20 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. डॉ. संदेश सुधाकर पोकळे (रा. मुंबई) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात त्याची पत्नी शर्मिला संदेश पोकळे
आणि गिरीश विठ्ठल ठाणेदार (रा. सांगली) या दोघांनी अटकपूर्व जामिन मिळविलेला आहे. तर सागर चंद्रकांत साटम (रा. कोल्हापुर), उदय शेलार (रा. चेंबुर), केदार काटकर (रा. मुंबई) आणि संतोष या चौघांवर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत सुरेश रामचंद्र पिसाळ (वय 42, रा. कोल्हापुर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना जून 2015 ते 30 ऑगस्ट 2016 या कालावधीत कोथरूड आणि कोल्हापुर परिसरात घडली. गिरीश ठाणेदार आणि सागर साटम यांच्या ओळखीने फिर्यादी आणि त्यांच्या भागीदाराने जमिन खरेदीचा व्यवहार डॉ. संदेश पोकळे याच्याशी सुरू केला. त्याचा फायदा घेत डॉ. संदेश याने सेल टॅक्‍सची जप्ती थांबविणे, बेंगलोर येथील शुगर फॅक्‍टरी आणि पवनचक्‍यांचे फायनान्स करण्याचे सांगून फिर्यादीकडून रोख आणि धनादेश स्वरूपात वेळोवेळी 3 कोटी 46 लाख रुपये घेतले. त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर फिर्यादीने ही रक्कम परत मागितली. त्यावेळी एनआरआय लोकांकडून गुंतवणूकीसाठी 500 कोटी रुपये मिळणार आहे. त्यावेळी पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी कर्ज मंजुर झाली असल्याचे दाखविण्यासाठी अधिकाऱ्यांची खोटी पत्रे फिर्यादींना व्हॉट्‌स अप, ई-मेलवर पाठवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. संदेश याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, फरार साथीदारांच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांणी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)