फसलेल्या नोटबंदीबद्दल मोदींना शिक्षा करण्याची वेळ

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयाबद्दल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. आपल्या ब्लॉगवर त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.

नोटबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेत जे पैसे जमा झाले त्याची मोजदाद आता झाली असून जुन्या नोटांपैकी 99.3 टक्के नोटा परत आल्या आहेत. जेमतेम 10 हजार 720 कोटी रूपये परत यायचे राहीले आहेत. त्यातून नोटबंदी फसल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले आहे, त्या पार्श्‍वभूमीवर यशवंत सिन्हा यांनी हे मत व्यक्त केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की नोटबंदीच्या काळात अनेक वेळा सरकारने नियम बदलले. अनेक वेळा नोटबंदीचा नेमका उद्देश काय याचे वक्तव्य बदलले. याविषयीचे एक उदाहरण देताना त्यांनी म्हटले आहे की सुरूवातीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये नोटा बदलून देण्याची अनुमती देण्यात आली होती. पण अहमदाबादच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत 745 कोटी रूपये पहिल्या पाच दिवसांत जमा झाल्यानंतर जिल्हा बॅंकांमध्ये नोटा बदलून देण्याची सवलत काढून घेण्यात आली. यातूनच या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते आहे असे त्यांनी म्हटले आहे.

काळापैसा, भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी नोटबंदी करण्यात आल्याचे मोदींनी जाहीर केले होते. नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादालाही पायबंद बसेल असे त्यांनी म्हटले होते. पण त्यापैकी एकही हेतु साध्य झाला नाही. नोटबंदीमुळे किमान तीन ते चार लाख कोटी रूपयांचा पैसा परत येणार नाही असे खुद्द केंद्र सरकारतर्फे ऍटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात एका निवेदनात नमूद केले होते याकडेही सिन्हा यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.

आता अर्थमंत्री म्हणत आहेत की केवळ काळ्यापैशासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता तर देशाची अर्थव्यवस्था ही कर भरणारी अर्थव्यवस्था असावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यांचे हे प्रतिपादन हास्यास्पद असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. चलनातील दोन हजार रूपयांच्या नोटांचे नेमके काय झाले? सध्या या नोटा कुठे गायब झाल्या आहेत? आणि त्या कोणी गायब केल्या आहेत असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

नोटबंदीमुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले याचीही अजून मोजदाद झालेली नाही. ती आता कदाचित नवीन सरकारकडून होईल. नोटबंदीमुळे बेरोजगारी प्रचंड वाढली असून हे लोक आता मनरेगावर रोजंदारीसाठी जाऊ लागले आहेत म्हणूनच मनरेगाचे बजेट 55 हजार कोटींनी वाढवावे लागले आहे असेही यशवंत सिन्हा यांचे म्हणणे आहे.

नोटबंदीच्या काळात पंतप्रधानांनी एका जाहींरसभेत सांगितले होते की मला तुम्ही फक्त 50 दिवस द्या. या 50 दिवसात नोटबंदीचा उद्देश साध्य झाला नाही तर कोणत्याही चौकात मला बोलावून तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या. त्यानुसार आता खरोखरच मोदींना शिक्षा देण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)