फळभाज्या आवक वाढली असल्याने बाजारभाव ढासळले

रेडा- गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने त्यातच बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. इंदापूर तालुक्‍यांतील भाजीपाल्यांचे आगार म्हणून परिचित असलेले वरकुटे खुर्द, काटी, बावडा, रेडणी या भागांतील शेतकऱ्यांना काटी आणि शहाजीनगर, तसेच बावडा गावी आठवडे बाजारात अल्प दरात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील हाती मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
काटी गावचा दर आठवडे बाजार मंगळवारी असतो, तर शहाजीनगर, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. या दोन्हीही आठवडे बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. बावडा आणि रेडणी गावी मेथी, वांगी, कारले, तसेच शेपू, चुका भाजी जास्त प्रमाणात दाखल झाल्याने ग्राहकांना “या भाज्या घ्या’ असे म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली होती. काकडी, दोडका, ढोबळी मिरची, कारले, वांगी, टोमॅटो आदींसह विविध फळभाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेल्या फळभाज्यांना समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. 20 किलो वजनी जाळी असलेल्या कारल्याची 15 ते 20 रुपये दराने, तर काकडी 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. वांगी 30 रुपये किलो, दोडका 18 ते 20 रुपये आणि ढोबळी मिरची 20 ते 30 रुपये किलो दराने विक्री झाली.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. त्यातच एकीकडे आवक वाढल्याने आणि मुंबईसह अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरले आहेत. इंदापूर तालुक्‍यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढल्यास बाजारपेठेत शेतमालाला उठाव मिळणार नाही, त्यामुळे बाजारभाव पुन्हा ढासळण्याची शक्‍यता आहे.
वरकुटे खुर्द आणि काटी परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागण करीत असतो. मागील महिन्यात मेथीची एक पेंडी तब्बल 25 रुपयापर्यंत गेली होती. शेतकऱ्यांनी मेथी जास्त लावली आणि आता फक्त पाच रुपायांना एक पेंडी विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. तोडणी आणि मजुरीचे पैसे देखील हाती लागत नसल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.

  • मजुराचे देखील पैसे हाती लागत नाहीत
    भाजीपाला विक्री ठिकाणी जाईपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च आहे, तसेच मेहनत देखील रात्रंदिवस करावी लागत असते. त्यातच औषधे फवारणी खर्चिक स्वरूपाची असल्याने आणि आता भाजीपाल्याला दर नसल्यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याची प्रतिक्रिया युवा शेतकरी प्रसाद देवकर- पाटील (शहाजीनगर) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)