फळभाज्यांच्या दरांची घसरण थांबली

बाजारभाव ः पालेभाज्यांचे दर मात्र शेतकऱ्यांना रडवताहेत

पिंपरी- गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरांमध्ये होत असलेल्या घसरणीस या आठवड्यात ब्रेक लागला आहे. परंतु पालेभाज्यांना अजूनही चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पालेभाज्या मातीमोल दरात विकाव्या लागत आहेत. मोशी येथील नागेश्‍वर उपबाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली असून मागणी वाढल्याने फळभाज्यांच्या दरांची घसरण थांबलेली दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लसूण, आले, भेंडी, बटाटा यांच्या दरात वाढ झाली आहे.

मोशी व पिंपरी येथील भाजी मंडईमध्ये या आठवड्यात परराज्यातून येणाऱ्या फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. मोशी येथील उपबाजार समितीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात फळभाजींची आवक 149 क्विंटलने कमी झाली आहे. पालेभाज्यांची 2 हजार 350 गड्ड्यांनी कमी झाली आहे तर फळांची आवकही 46 क्विंटलने कमी झालेली पहायला मिळत आहे. फळभाज्यांची आवक कमी झाली असली, तरी उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने आता मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काळात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. कांदा, भेंडी, कोबी यांच्यादरामध्ये मोठी घसरण झाली होती. कांद्याचा दर तर घाऊक बाजारात 2 रुपये ते 3 रुपये किलोवर येऊन पोहचला होता, यामुळे कांदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळभाज्यांची होत असलेली घसरण काही प्रमाणात थांबली आहे. या आठवड्यात बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवकही मागणीच्या तुलनेत कमी झाली आहे. आवक कमी झाली असली तरी दर मात्र स्थिर असल्याचे पहायला मिळाले. या आठवड्यापर्यंत कांद्याच्या दरामध्ये होत असलेली घसरण थांबली असून कांद्याची आवक वाढूनही प्रति क्विंटल 450 रुपये भाव मिळाला आहे. या आठवड्यात बटाट्याची आवक 100 क्विंटलने कमी झाल्याने बटाट्याचे दर प्रति क्विंटल 100 रुपयाने वधारले आहेत. तर लसणाची आवक केवळ चार क्विंटल झाल्याने दरामध्ये प्रति क्विंटल एक हजार रुपयाची वाढ होऊन लसूण प्रति क्विंटल 2 हजार 500 रुपयावर जाऊन पोहचला आहे. लसणाबरोबरच “आले’च्या दरामध्ये वाढ झाली असून आल्याचा दर प्रतिक्विंटल 5 हजार 500 रुपयावर जाऊन पोहचला आहे. भेंडीची आवक या आठवड्यात 18 क्विंटलने कमी झाली असून दर मात्र प्रति क्विंटल 250 रुपयांनी वाढला आहे. गवारी, टोमॅटोची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहे. गवारीची आवक वाढल्यानंतरही पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मिरचीची आवक या आवठवड्यात 9 क्विंटलने वाढली असूनही दरामध्ये वाढही झाली आहे. मिरची प्रति क्विंटल 3 हजार 500 रुपयाला मिळत आहे. मिरचीबरोबरच फ्लॉवर, कोबी, आणि वांग्याच्या दरामध्येही या आठवड्यात वाढ झाली आहे.

या आठवड्यात काही फळभाज्यांची आवक वाढल्यानंतरही दरामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पहायला मिळले. तर काही फळभाज्यांची आवक घटल्यानंतरही दरामधील घसरण थांबलेली नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर या आठवड्यात स्थिर राहिले आहेत.

मेथी, कोथिंबीरची गड्डी दोन रुपयाला
उन्हाळा सुरु झाल्यानंतर पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, सध्या घाऊक बाजारात पालेभाज्यांना मातीमोल दर मिळत आहे. घाऊक बाजारात मेथी, कोंथीबिरीच्या गड्डीचे शेतकऱ्यांना 1 किंवा 2 रुपये मिळत आहेत. येथून व्यापारी भाजी मंडईमधील व्यापाऱ्यांना मेथी, कोथींबीर, शेपू, कांदापात, पालक या पालेभाज्या तीन ते सहा रुपये प्रति गड्डी या दराने विकत आहेत. ग्राहकांपर्यंत येईपर्यंत या भाज्यांची किंमत 10 ते 20 रुपयांच्या घरात जाते. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे घसरलेले दर शेतकऱ्यांच्या आडचणीत वाढ करणारे ठरत आहेत.

उन्हाच्या चटक्‍यातही फुलांचे दर स्थिर
मागच्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे फुलांचे दरामध्ये वाढ होईल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्याप तरी फुलांचे दर सर्वसाधारण बाजारात स्थिर आहेत. बाजारात फुलांची आवक घटली असली तरी लग्नसराईच्या तुरळक तारखांमुळे शोभिवंत फुलांची मागणी होत आहे. जरबेरा, गुलाब बरोबरच झेंडूंची मागणीही स्थिर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)