फळबागांवरील जमिनींवर “समृद्धी’ नको – उद्धव ठाकरे

औरंगाबाद, नाशिक, सिन्नर येथील शेतकऱ्यांनी दिले प्रेझेंटेशन

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवसेनेने पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे. शेतक-यांच्या सुपिक आणि फळबागायती असलेल्या जमिनींवरून ‘समृद्धी’चा महामार्ग जाऊ देणार नाही. शेतक-यांच्या जमिनी वाचविण्यासाठी प्रस्तावित महामार्गाच्या शेजारी असलेल्या जुन्या महामार्गाला जोडून नवीन समृद्धीचा विकास करा, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला बजावले आहे.

समृद्धी महामार्गामुळे बाधित होणा-या औरंगाबाद, नाशिक, सिन्नर येथील शेतक-यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची “शिवालय’ येथे भेट घेतली. यावेळी शेतक-यांनी आपल्या सुपिक जमिनी कशा वाचतील याचे उद्धव ठाकरे यांना प्रेझेंटेशन दाखवले. प्रस्तावित समृद्धी महामार्ग हा शेतक-यांच्या सुपिक जमिनी आणि फळबागावरुन जात असल्याची वस्तूस्थिती या शेतक-यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली.

यावेळी शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, जोपर्यंत शेतक-यांचे समाधान होत नाही तोपर्यंत हा महामार्ग होणार नाही. ही शिवसेनेची कालही आणि आजही तीच भूमिका आहे. समृद्धी महामार्गाबाबत शिवेसेनेने शेतकऱ्यांना वचन दिले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यत भूसंपादन होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केल्याची माहिती मंत्री रामदास कदम यांनी दिली.

समृद्धीसाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जेथे आंदोलन केले, अशा ठिकाणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे येत्या आठ दिवसांत भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान शिंदे हे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्यासोबत सरकारी अधिकारीही जाणार आहेत, असे रामदास कदम यांनी सांगितले.

शिर्डी-औरंगाबाद महामार्ग समृद्धीमध्ये रुंपातर करा

प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या अवघ्या दिड किमी अंतरावरुन औरंगाबाद-शिर्डी हा 130 किमी लांबीचा जुना महामार्ग जातो. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी प्रस्तावित समृद्धीचा मार्ग या जुन्या महामार्गाला जोडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे असताना शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनीवरूनच समृद्धीचा महामार्ग नेण्याचा हट्टहास कशासाठी, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)