फलटण पालिकेत पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

आरोग्य समिती सभापतीपदी अजय माळवे, बांधकाम सभापतीपदी मधुबाला भोसले

फलटण – फलटण नगरपरिषद विषय समित्यांचे सर्व सभापती निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. आरोग्य समितीच्या सभापतीपदी अजय माळवे यांची तर बांधकाम समितीच्या सभापतीपदी ऍड. मधुबाला भोसले यांची निवड झाली आहे. शहरात सध्या महात्वाकांक्षी भुयारी गटार योजना व स्वच्छ सर्वेक्षण यांचे काम सुरू असल्याने या निवडींना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण नगरपरिषदेच्या विशेष सभेत सदर विषय समितीच्या निवडी पिठासन अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यधिकारी प्रसाद काटकर व नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी जाहिर करण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी ऍड. मधुबाला भोसले, पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती सभापतीपदी ज्योत्स्ना शिरतोडे, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी अजय माळवे, शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी असिफ अब्दुल मेटकरी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुवर्णा खानविलकर, उपसभापतीपदी प्रगती कापसे, स्थायी समितीत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर व अशोक जाधव यांच्या सदस्यपदी निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आहेत.

विषय समितीच्या सभापतीपदासाठी असणारे नामनिर्देश पत्र स्विकारल्यानंतर पिठासन अधिकारी विजय पाटील यांनी नामनिर्देश पत्रांची छाननी करून निवडी जाहीर केल्या. निवडीनंतर नगराध्यक्षा निता नेवसे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचा सत्कार केला. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नूतन सभापतींचे तहसिलदार विजय पाटील यांनी अभिनंदन केले. यानंतर नूतन पदाधिकारी व स्थायी समिती सदस्यांचे सुभद्राराजे नाईक-निंबाळकर व नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर आभार मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी मानले.

दरम्यान, फलटण शहर स्मार्ट सिटी करणे, शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारी भुयारी गटार योजना, स्वच्छ सर्वेक्षण या योजनांतर्गत शहरात कामे सुरू आहेत. कामे दर्जेदार होण्याच्या दृष्टीने अभ्यासू सभापती असणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने निवडींचा बॅंलन्स साधल्याने समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)