फलटण- फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने यंदाचे राज्य, पुणे विभाग आणि सातारा जिल्हास्तरावरील आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच सामाजिक पुरस्कार जाहीर झाले असून दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता फलटण येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष निलेश सोनवलकर यांनी केली आहे.

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकार आणि सामाजिक पुरस्कारांची घोषणा करताना सोनवलकर बोलत होते. संघाचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे आणि फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. यावेळी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ. ज्योती आंबेकर यांना जाहीर झाला आहे.

प्रगतशील शेतकरी कै.दशरथराव साळुंखे (पाटील) स्मृती पुणे विभागस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांना जाहीर झाला आहे. माजी नगरसेवक, उद्योजक कै. सुभाषराव निंबाळकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार खटाव येथील पत्रकार अविनाश कदम यांना जाहीर झाला आहे. वै. ह. भ. प. राजाराम जिजाबा झांबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा सामाजिक पुरस्कार आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील दुरदर्शन कलाकार, धोंडीबा कारंडे यांना जाहीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)