फलटणमध्ये 26 रोजी मराठी साहित्य संमेलन

कोळकी – फलटण येथे दि. 26 रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार व साहित्यिक दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. विनोदी साहित्यसंमेलन म्हणून हे संमेलन प्रख्यात साहित्यिक स्व. पु. ल. देशपांडे यांना अर्पण केले आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विनोदी लेखक व वक्ते सुभाष खुटवड (पुणे) यांची निवड झाली असून उद्‌घाटन इतिहास संशोधक व वक्ते श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक संचालक विश्‍वनाथ पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले व सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले की, या संमेलनासाठी श्रीसद्‌गुरू प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, यशवंतराव चव्हाण स्मृति प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दरवर्षी विविध साहित्यिक कार्यक्रम होत असतात. यावर्षी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दिचे औचित्य साधून हे संमेलन त्यांना समर्पित करीत आहोत. विनोदी एकपात्री कलाकार बंडा जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण दिवसभर विविध विनोदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

त्यामध्ये सकाळच्या सत्रात हास्यकवी बंडा जोशी, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर व दुपारच्या सत्रात अभय देवरे (सातारा), राहुल कुलकर्णी (कोल्हापूर) आणि बंडा जोशी (पुणे) यांचे विनोदी एकपात्री सादरीकरण होणार आहे. त्यानंतर ग्रामीण कथाकथनकार प्रा.रविंद्र कोकरे यांचे विनोदी कथाकथन होणार आहे.

याच समारंभात दरवर्षीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व यशवंत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांना तसेच यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून या साहित्य संमेलनासाठी साहित्यिक व साहित्यप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी-बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले, कार्याध्यक्ष प्रा. रविंद्र कोकरे, कार्यवाह प्रा. विक्रम आपटे, अमर शेंडे, यशवंराव चव्हाण स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजीराव सूर्यवंशी-बेडके यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)