फलटणमध्ये 25 डिसेंबरपासून रंगणार “कलारंग कला महोत्सव’

फलटण ः कलारंगच्या बोधचिन्ह प्रकाशनाप्रसंगी सुरेश लोणकर, वैजनाथ दुलंगे, रविंद्र बेडकिहाळ, संदिपकुमार जाधव, सौ.भारती जगताप, प्रदिप नाळे.

फलटण, दि. 5 (प्रतिनिधी) – फलटण तालुक्‍याला गौरवशाली इतिहास लाभला आहे. पुरातन काळापासून नाट्य, नृत्य, गायन, वाद्य, शिल्प, चित्र, साहित्य यांच्या माध्यमातून अभिजात कलेचे सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचवले जात होते. अशा स्थानिक नव्या, जुन्या कलाकारांचे स्वत:चे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी 25 डिसेंबर रोजी फलटण येथील पुरातन शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या जबरेश्‍वर मंदिर परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कलारंग कलामहोत्सवआयोजित केला आहे, अशी माहिती कलारत्न आर्ट इन्स्टिट्यूटचे प्रमुख संदिपकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रसिद्ध चित्रकार सुरेश लोणकर, व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, महोत्सवाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते.
संदिपकुमार जाधव यांनी सांगितले की, कार्यक्रमाला कला संचालनालयाचे व राज्य कला अध्यापक महासंघाचे सहकार्य लाभणार आहे. क्षितीज सामाजिक व शैक्षणिक संस्था, स्वरसाधना संगीत विद्यालय, फलटण या महोत्सवाच्या सहयोगी संस्था आहेत. 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जबरेश्‍वर मंदिर परिसरात महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. श्रीराम मंदिरासमोरील खुल्या जागेत चित्र व शिल्प प्रदर्शन दालनाचे उद्घाटन होईल. महोत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे श्रीराम मंदिरासमोरील मुख्य व्यासपीठावर गायन, वाद्य, चित्र, व्यंगचित्र, शिल्प, नृत्य व शिघ्रकविता या सात कला एकाच मंचावर सादर होणार आहेत. तसेच दिवसभर शास्त्रीय गायन, जुगलबंदी व व्यक्तिचित्रण निसर्गचित्रे यांचे रेखाटन आयोजित केले आहे.
महोत्सवानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या स्मरणिकेसाठी लेख तसेच प्रदर्शन दालनामधील प्रकाशित करण्यासाठी तालुक्‍यातील कलाकारांनी चित्रे, व्यंगचित्रे पाठवावीत, माहितीसाठी भारती जगताप-शिंदे, प्रदीप नाळे, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संदिप जाधव यांनी केले आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)