फलटणकरांचा स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग

फलटण, दि. 6 (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत फलटण शहरात स्वच्छता अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून शहरवासियांकडूनही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असलेले फलटण या अभियानाद्वारे अधिक स्वच्छ, सुंदर, सुशोभित होत असल्याने फलटणकरांच्या उत्साहाला नगरपरिषदेचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. स्वच्छता मोहिमेला नागरिकांचे “उधाण आलं’ असून शहरातील अस्वच्छतेची धुलाई सुरु आहे.
फलटण शहरातील गटारे किंवा सांडपाणी कधीच फारशी अस्वच्छ वाटली नाहीत. काही अपवाद वगळता सांडपाण्याचा निचरा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था पूर्वांपार असल्याने सांडपाण्याद्वारे शहरात अस्वच्छता निर्माण झाल्याची उदाहरणे फारशी नाहीत. तथापि राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 72 कोटी रुपये खर्चाची भुयारी गटार योजना मंजूर झाली असून त्याचे काम सध्या वेगात सुरु आहे. त्यामुळे सांडपाण्याद्वारे काही प्रमाणात होणारे शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीपात्राचे प्रदूषणही यापुढे राहणार नाही.
फलटण शहराची लोकवस्ती 50/55 हजार आहे. तथापि शेजारच्या कोळकी, फरांदवाडी, जाधववाडी या गावातील लोकांचा वावर सतत फलटण शहरात होत असल्याने शहराची फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास 1 लाखापर्यंत जाते. त्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेने पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण वगैरे सुविधा निश्‍चितपणे पुरेशा असल्याने फ्लोटिंग पॉप्युलेशनमुळे नागरी सुविधावर ताण येत असला तरी त्याची कमतरता कोठेही जाणवत नसल्याने शहरवासियांनी शेजारच्या गावातील या लोकसंख्येला स्वीकारले आहे. मात्र स्वच्छता अभियानात त्याचा काही परिणाम निश्‍चित जाणवतो आहे.
30 ठिकाणांचे सुशोभिकरण
या अभियानात शहरातील कचराकुंड्या काढून टाकून जेथे कुंड्या काढल्यानंतरही अस्वच्छता निर्माण होत होती अशी काही ठिकाणे प्राधान्याने स्वच्छ व सुशोभित करण्याची विशेष योजनाच नगर परिषद आणि कमिन्स कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आली. त्यामुळे शहरातील अशी 30 ठिकाणे सुशोभित करण्यात आल्याने आता त्याठिकाणी कचरा टाकण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. परिणामी ही 30 ठिकाणे केवळ सुशोभित झाली नाहीत तर त्याद्वारे शहराच्या सुशोभिकरणाला आणि स्वच्छतेला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.
16 घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा
शासनाच्या विशेष अनुदानातून नगरपरिषदेने 16 घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. या सर्व 16 घंटागाड्यांवर ध्वनीवर्धक लावून शहराच्या प्रत्येक प्रभागात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याची अनोखी योजना राबविली आहे. या सर्व 16 घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. शहरवासियांनी घंटागाडीच्या या यंत्रणेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगळा साठवून घंटागाडीमध्ये देण्याची जबाबदारी स्विकारली असल्याने अस्वच्छता निर्माण होत नाही.
हॉटेल, मार्केट वेस्टसाठी स्वतंत्र घंटागाडी
नगरपरिषदेने खरेदी केलेल्या 16 घंटागाड्यांपैकी 14 घंटागाड्या 12 प्रभागात कार्यान्वित असून उर्वरित 2 घंटागाड्यांपैकी गाडी शहरातील छोट्या मोठ्या हॉटेल्समधील कचरा व अन्य हॉटेलवेस्ट एकत्रित करुन कचरा डेपोपर्यंत पोहोचवते. दुसरी घंटागाडी शहराच्या बाजारपेठेतील कचरा संकलित करुन त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करते. या सर्व 16 घंटागाड्यांसाठी प्रशिक्षित चालक त्याशिवाय एक मदतनीस उपलब्ध करुन देण्यात आला असल्याने शहरवासियांना आता ही यंत्रणा आपली वाटू लागल्याने शहरातील कचरा संकलनाचे काम अत्यंत सुरळीत, शिस्तबध्दरितीने आणि स्वच्छतेला प्राधान्य देणारे ठरले आहे.
2 ट्रॅक्‍टर्स, 2 टेम्पोद्वारे कचरा संकलन
रस्त्यावर टाकला जाणारा राडारोडा, गटारातील वेस्ट किंवा काही ठिकाणी गटारातून काढून टाकलेला गाळ तसेच रविवारच्या आठवडा बाजारादिवशी मार्केट परिसरात साठलेला मोठ्या प्रमाणावरील कचरा विशेषत: भाजीपाल्याचा कचरा उचलण्यासाठी नगरपरिषदेचे दोन ट्रॅक्‍टर्स आणि दोन टेम्पो कार्यरत असल्याने घंटागाडीच्या मार्गाशिवाय अन्यत्र साठणाऱ्या कचऱ्याचे संकलन व तो कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रहिवास, व्यापारी क्षेत्रात झाडलोट
नगरपरिषदेला शहरातील सर्व 12 प्रभागातील रहिवास क्षेत्र सतत स्वच्छ राखण्याला प्राधान्य द्यावे लागते. त्या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेचा आरोग्य विभाग संपूर्ण शहराची रोज झाडलोट करण्याला प्राधान्य देत आहे. तसेच नगरपरिषदेने व्यापार पेठेत दिवसातून 2 वेळा विशेषत: बाजार पेठ बंद झाल्यानंतर रात्रीही झाडलोट आणि कचरा संकलन केले जाते. त्यामुळे शहर स्वच्छतेमधील झाडलोट हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. शहर स्वच्छतेसाठी 110 कर्मचारी आणि त्याशिवाय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सार्वजनिक स्वच्छतागृह व परिसर स्वच्छता
शहरात एकूण 64 सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्या आहेत. या सर्व ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. केवळ सार्वजनिक शौचालयेच नव्हे तर त्यांचा परिसरही स्वच्छ ठेवण्यात येत आहे. अशा सार्वजनिक शौचालये, बाजार पेठ, शाळा/ विद्यालयांचा परिसर, रिक्षा स्टॉप वगैरे प्रमुख ठिकाणी लक्षात येतील अशा पध्दतीने ओला व सुका कचऱ्यासाठी 2 डस्टबीन खास स्टॅंण्ड तयार करुन त्यावर बसविण्यात आली आहेत.
कचऱ्यापासून दरमहा 21 हजाराचे उत्पन्न
शहरातून दररोज 11.50 मे. टन ओला आणि 4.50 मे. टन सुका असा एकूण 16.40 मे. टन कचरा दररोज संकलित करण्यात येत असून त्यापासून अंदाजे दररोज 0.80 मे.टन कंपोस्ट खत निर्मिती केली जाते त्यापासून दरमहा 21 हजार रुपयांचे उत्पन्न नगरपरिषदेला मिळते आहे. नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर गेल्या काही वर्षापासून साठून राहिलेला कचरा रिसायकल करण्यात येत असून या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चौकट
महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या शहराचे नगराध्यक्षपद भूषविले असल्याने शहर स्वच्छता आणि नागरिकांच्या अपेक्षा याविषयी त्यांना पूर्ण माहिती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेने त्यांची स्वच्छता अभियान ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करुन त्यांच्या शहर स्वच्छ, सुंदर, सुशोभित करण्याच्या संकल्पनांना प्राधान्य देत स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये आघाडी घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष सौ. नीताताई मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, आरोग्य सभापती अजय माळवे, माजी आरोग्य सभापती सौ. वैशालीताई अहिवळे विविध समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील असताना शहरवासीयांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने फलटण शहर अधिक स्वच्छ, सुंदर, सुशोभित बनले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)