फलटण – जम्मू काश्मिरातील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अमानुष अत्याचाऱ्याच्या प्रकरणांचा फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या मोर्चात सर्व जाती धर्माच्या तसेच सर्व पक्षीयांनी सहभाग घेतला होता. यावेळी कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे, सुधीर अहिवळे, नगरसेवक अशोकराव जाधव, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे, शाम अहिवळे, हर्षल लोंढे, आप्पा काकडे, अनिकेत मोहिते, मंगलदास निकाळजे आदी उपस्थित होते.
मोर्चाची सुरुवात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथून झाली. मोर्चा पंचशिल चौक – बारामती चौक – छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. आंबेडकर चौक – महावीर स्तंभ – उमाजी नाईक चौक – गजानन चौक – म. फुले चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार विजय पाटील यांना मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिले की शासन आपल्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेईल.
सनी काकडे म्हणाले, भाजप सरकार हे जातीयवादी सरकार आहे आणि या सरकारच्या काळातच अशा घटना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. असिफा या 8 वर्षाच्या निरागस मुलीवर केलेला अत्याचार हा देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे, अशा घटना येथून पुढे घडु नये यासाठी सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजेत.
नगरसेवक अशोकराव जाधव म्हणाले की, असिफावर झालेल्या निर्दयी अत्याचाराचा कॉंग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आप्पा काकडे,अनिकेत मोहिते, मंगलदास निकाळजे, शाम अहिवळे यांनी मनोगत व्यक्त केले. या मुक मोर्चास सर्व मुस्लीम संघटना, तसेच सर्व पक्षांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा