फलटणचा ऐतिहासिक ठेवा : जबरेश्‍वर मंदिर

अजय माळवे
छत्रपती शिवरायांच्या पत्नी सईबाई निंबाळकर यांचे माहेर व महानुभव व जैन धर्मियांची दक्षिण काशी असलेल्या फलटणच्या जबरेश्‍वर मंदिर हा शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. फलटण शहरात यादव काळात (इ.स. 1000 ते 1400) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन “जरबेश्वर मंदिर होय. आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्याजवळ रस्त्याच्या मधोमध हेमांडपंथी शैलीतील मंदिर आहे. एकाच प्रचंड आकाराच्या शिलेमधून कोरुन काढल्यासारखे भासते. बंदिस्त सभागृहाचा आकार गोलाकार आहे. हे मूळचे जैन मंदिर असावे. येथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (1853 – 1916) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्‍पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मुर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्‍मिणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभाऱ्यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिंडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिरबाहेर असलेल्या शिल्पांची बरीच मोडतोड झाली आहे.
मंदिरात दोन शाळीग्राम असलेली शिवपार्वती प्रकारातील पिंड आहे. हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले, अशी माहिती मिळते. हिंदू- जैन संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारे हे मंदिर फलटण नगरीचे प्राचीनत्व सिद्ध करते. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)