फलकांमुळे झाडांचे आयुष्य धोक्‍यात

गोंदवले ः दहिवडी- गोंदवले सह अनेक झाडांवर अशा फुकट्या जाहिराती करून झाडांचे आयुष्य धोक्‍यात आणले आहे. (छाया ः संदीप जठार)

व्यावसायिकांवर वेळीच पायबंद घालण्याची गरज

गोंदवले, दि. 12 (प्रतिनिधी) – खासगी व्यावसायिक लोकांनी आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चांगल्या झाडांची निवड केल्याने झाडांचे आयुष्य धोक्‍यात आले आहे. या व्यावसायिकांवर वेळीच पायबंद घालून झाडांचे रक्षण करणे गरजेचे आहे
कोणताही व्ययसाय म्हटल की जाहिरात ही करावीच लागते. सध्या अनेक कॉलेज, शाळा, विविध कोर्स असणाऱ्या ऍकॅडमीची ऍडमिशन सुरू असून प्रत्येक संस्था आपल्या शैक्षणिक संस्थेत काय काय नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीद्वारे मुलांच्यापर्यत पोहचवण्यात मग्न आहेत. या जाहिरातीवर आपल्या संस्थेच्या फोन नंबरपासून राबवण्यात येणारे विविध मुद्दे यावर लिहितात. अनेक जण कागदी फ्लेक्‍स किंवा पत्र्याच्या बोर्डवर मांडणी करून ते बोर्ड जाहिरातीचे छोटे फलक माण- खटाव तालुक्‍यातील अनेक झाडांवर टोकदार खिळे ठोकून लावण्यात आल्याने अनेक झाडांचे आयुष्य धोक्‍यात आलेले आहे.
सातारा- पंढरपूर या मार्गावर असणारी अनेक झाडे रस्ता रुंदीकरणाच्या कामात तोडण्यात आली. त्यामुळे हा मार्ग एकदम भकास दिसत आहे. फुकटात जाहिरात करण्यासाठी या मार्गापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या चांगल्या झाडांवर या व्यावसायिक लोकांची नजर पडली. या झाडांवर टोकदार खिळे, लोखंडी तार, पत्र्याचे वायसर स्क्रू, अशा साहित्यांनी ते फलक झाडांवर लोकांना दिसतील अशा ठिकाणी लावण्यात आले आहेत. एका झाडावर अनेक फलक असून जणू त्या झाडावर फलक लावण्याचा परवाना घेतल्याप्रमाणे फलकांची रेलचेल आणि गर्दी केली आहे. झाडाचा बुंधा दिसणार नाही एवढे फलक लावण्यात आले आहेत. असे फलक दहिवडी शहर, गोंदवले आणि रस्त्याकडेला मुख्य चौकात असणारी झाडे टार्गेट करण्यात आली आहेत. या खिळ्यामुळे झाडांचे आयुष्यमान धोक्‍यात आले आहे. संबंधित झाडांवर जाहिरात करून झाडांसह पर्यावरणावर घाला घालणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे. त्यांच्याकडून आणखी झाडे लावण्याचे हमी पत्र तयार करून घेण्यात यावे अशी मागणी होत आहे. दहिवडी शहरात ही हॉटेल कृष्णा शेजारी असणारे झाड या जाहिरातीला बळी पडले आहे. मायणी चौकाच्या नजीकसुध्दा असाच प्रकार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात असणाऱ्या ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांनी यावर बारीक नजर ठेवली तर पर्यावरण वाचण्यास मदत होईल.
ग्रीन माण- खटाव योजनेअंतर्गत माण -खटावमध्ये लाखो झाडांचे रोपण करण्याचे काम सुरू झाले आहे. या रोपणाने माण तालुक्‍यातील वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संगोपन ही मोहीम देखील राबवण्याच काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात सर्व गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आताच या फुकट्या जाहिरातदारांना जर रोखले तर भविष्यात झाडांवर हे संकट येणार नाही. परिणामी पर्यावरणाचा समतोल वाढण्यास मदत होईल.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)