फर्नेस ऑईल,उर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबवणार

ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात उभारणार
फलटण – राज्यभर प्रामुख्याने शहरी भागात कचऱ्याची विल्हेवाट ही मोठी समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात उभारुन त्यातून फर्नेस ऑईल आणि उर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प सातारा जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभिनव प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली असून त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करुन वरीलप्रमाणे निर्णय करण्यात आला. या बैठकीत नगर विकास खात्याचे सचिव, पर्यावरण सचिव अनिल डिगीकर, प्रदुषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अनबलगम, स्वच्छ भारत अभियान कार्यकारी संचालिका सीमा ढमढेरे, तसेच सातारा जिल्ह्यातील नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीतील निर्णयानुसार प्लॅस्टिक अथवा थर्माकोल सारख्या घटकांना वितळविण्याचे संयंत्र बसविण्यात येणार असून त्यातून जे अशुध्द तैल पदार्थ व उपपदार्थ निर्माण होतील त्यापासून उच्च दर्जाचे तेल व जैविक इंधन उत्पादित केले जाणार आहे. उपरोक्त प्रस्तावित यंत्रणेपासून पुढे औष्णिक विद्युत निर्माण करण्यात येणार असून जैविक खते, जैवीकल्चर, निर्जलीकरण केलेले जैव द्रव्यमान याचे उत्पादन होणार आहे. ज्याचा फायदा परिसरातील उद्योगांना सहाय्यक ठरणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्तावित स्थळ व अनुषंगीक इतर प्रक्रियास्थळे योग्य अशा भौगोलिक ठिकाणी स्थापित केली जाणार असून जिथे जैव इंधन, जैव तेल पदार्थ निर्माण होतील असे मध्यवर्ती प्लॅस्टिक प्रक्रिया केंद्र वाई अथवा खंडाळा परिसरात स्थापित केले जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र स्थानिक पातळीवर जैव कचरा प्रक्रियेसाठी परिपूर्ण राहणार असून पुर्नप्रक्रिया न होणाऱ्या कचऱ्याला वितळवून दररोज अंदाजे 10 टन इतक्‍या क्षमतेचा असा कचरा तैलपदार्थ व इतर उपपदार्थ निर्मीतीसाठी मध्यवर्ती प्रक्रिया केंद्राकडे पाठविला जाणार आहे.

सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी पार्क, पुणे ही संस्था नवउद्योजकांच्या उत्कृष्ट, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाला सर्वांगीण मदत देवून संवर्धीत करत आली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाच्या निधीप्रयास योजनेंतर्गत हे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले असून सातारा जिल्ह्याच्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सर्व बाबींचा लोकोपयोगी फायदा असल्याने व त्यातील तंत्रज्ञानाचा एकात्मिक उपयोग समाजास मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने वरील प्रकल्प विकसित होण्यासाठी सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी पार्कने सर्वतोपरी सहाय्य केले आहे. उपरोल्लेखीत तंत्रज्ञानातील जैविक मिथेन प्रक्रिया घटक हे प्रतिदिन किमान 10 किलोग्रॅम ओल्या कचर्यावर आणि जास्तीत जास्त 5 टनापर्यंत प्रक्रिया करु शकते.

या प्रकल्पांतर्गत सुका कचरा, प्लॅस्टिक, थर्माकोल यावरील प्रक्रियेसाठी ठोस तांत्रिक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यामध्ये वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या कचऱ्याचा वापर करुन उर्जा निर्मिती आणि सुक्‍या कचऱ्यापासून फर्नेस आईल तयार करणेबाबत प्रत्येक नगर परिषदेने प्रक्रिया केंद्र उभारावे अशी सूचना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकीत केल्यानंतर उपस्थित वरिष्ठ शासकीय अधिकार्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करुन प्रत्येक नगर परिषदेमध्ये असे केंद्र सुरु करण्यास सहमती दर्शविली.

सुक्‍या कचऱ्यातील विघटनशील व पुर्नप्रक्रिया होवू शकणार्या पदार्थांचे पायरोलीस प्रक्रियेद्वारे तैल पदार्थ निर्मिती केली जाते तर त्यातील अविघटनशील व पुर्नप्रक्रिया न होवू शकणाऱ्या पदार्थांचे गॅसीफिकेशन केले जाते हे तंत्रज्ञान या प्रकल्पात राबविण्यात येणार असून सदर तंत्रज्ञान बेंगलोरच्या वैज्ञानिक संस्थेने विकसित केले असून त्यावर आधारित सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी पार्कने कंपनी स्थापन केली असून याचा मुख्य फायदा म्हणजे सतत प्रवाहित असणाऱ्या विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुलभ होणार असून जे आजपर्यंत होवू शकले नाही त्याचा मार्ग या प्रकल्पाद्वारे खुला होवून शहरी भागातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)