फरारी दोन हल्लेखोरांना पाच दिवसांची कोठडी

वाकी- खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील व चाकण औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या बोरदरा (ता. खेड) गावच्या हद्दीतील संधार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आठ दिवसांपूर्वी एकावर जीवघेणा हल्ला चढवून गावच्या महिला पोलीस पाटलांच्या घरी जाऊन त्याच रात्री धुमाकूळ घालणाऱ्या चार जणांच्या हल्लेखोर टोळीतील गजाआड करण्यात आलेल्या दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती शनिवारी (दि. 27) चाकण पोलिसांनी दिली. त्यामुळे गजाआड करण्यात आलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. यातील एक आरोपी मात्र, अद्यापही गायब असून, खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तुरुंगातून पेरॉलवर बाहेर पडल्यानंतर फरारी होऊन त्याने बोरदरा येथे हा प्रकार केल्याची बाब समोर आली आहे.

संदीप सुरेश पडवळ (वय 23, रा. बोरदरा, ता. खेड) या तरुणावर जीवघेणा हल्ला घझाला होता. यानंतर निवडणुकीच्या जुन्या वादातून गावच्या महिला पोलीस पाटलांच्या घरी जाऊनही हल्लेखोरांनी धुमाकूळ घातला होता. आकाश शेळके यांच्या फिर्यादीवरून त्याच दिवशी चाकण पोलिसांनी राजेश हनुमंत कांबळे (रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे), विठ्ठल नवनाथ पिकळे, दीपक उर्फ पांडा रोहिदास घनवट व मयूर मंडले या चार हल्लेखोरांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचदिवशी राजेश कांबळे याच्या मुसक्‍या आवळून त्याला तत्काळ चाकण पोलिसांनी गजाआड केले. त्याला खेडच्या न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने सलग दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-

पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना त्यांच्या एका गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस हवालदार संजय जरे, अनिल गोरड, प्रशांत वाहील, अजय भापकर आदींच्या पथकाने शुक्रवारी (दि. 27) रात्री मोईफाटा (ता. खेड) भागात सापळा रचला. या सापळ्यात पोलिसांनी विठ्ठल पिकळे (वय 19) व दीपक उर्फ पांडा घनवट (वय 23, दोघेही रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) यांना जेरबंद करण्यात आले. त्या दोघांना खेडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांनाही सलग पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जन्मठेपेच्या कैद्याचा गुन्ह्यात समावेश –
धारदार हत्याराने तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील फरारी संशयित आरोपी मयूर भीमराव मंडले (वय 30, सध्या रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ; मूळ रा. रामोशी चाळ, ओतूर, ता. जुन्नर) याच्यावर यापूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. ही शिक्षा भोगत असताना तुरुंगातून पेरॉल रजेवर बाहेर पडल्यानंतर फरारी होऊन त्याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल पिकळे व दीपक उर्फ पांडा घनवट या दोघांवरही चाकण पोलीस ठाण्यात यापूर्वी गंभीर व किरकोळ स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

एकाच खुनातील दोघेही जन्मठेपेचे कैदी –
आर्थिक कारणावरून प्रताप काळोखे (वय 45, रा. तळेगाव दाभाडे) यांचा जुलै 2010 मध्ये धारदार शस्त्रांनी वार करून खून झाला होता. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने डिसेंबर 2015मध्ये यातील आरोपी धनराज दास कांबळे व मयूर भीमराव मंडले या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. धनराज दास कांबळे हा 4 मार्च 2017 रोजी पश्‍चिम विभाग कारागृह महानिरीक्षक, पुणे यांच्या आदेशानुसार 28 दिवसांच्या संचित रजेवर असताना फरारी झाला होता. कित्येक दिवसांपासून त्याचा तपास लागलेला नाही. त्यानंतर याच खुनातील जन्मठेपेतील दुसरा कैदी मयूर मंडल देखील संचित रजेवर बाहेर पडून फरारी झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)