फडणवीसांची विरोधकांवर कुरघोडी…

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वासाचा डाव उधळला


सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीत सभागृहाचे कामकाज गुंडाळले


विरोधकांनी केला सरकारचा निषेध

मुंबई – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आणण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुशारीने उधळून लावत विरोधकांवर कुरघोडी केली. अविश्वास ठरावावर चर्चा होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अचानक विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावाला शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन देत हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला.

यानंतरही विरोधकांना वारंवार अविश्वास ठरावावर बोलण्याची संधी न दिल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळातच महत्त्वाची विधेयक संमत करून घेत तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. दरम्यान, सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागू नये म्हणून पळपुटेपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

गेले दोन दिवस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा रद्द करण्यासाठी शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभागृहाचे रोखून धरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्माला स्थगिती दिल्यानंतर कामकाज पूर्ववत झाले असतानाच शुक्रवारी विरोधकांनी अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर चर्चेची मागणी केली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य विरोधीपक्षांच्या वतीने 5 मार्च रोजी अविश्वासदर्शक प्रस्ताव देण्यात आला होता.

अविश्वास ठराव मांडण्यासाठीचा 14 दिवसांचा कालावधी 18 मार्च रोजी संपल्यानंतर विरोधकांकडून 20 मार्च रोजी अविश्वास ठराव आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी ठराव आणू, असे सांगत वेळ मारून नेली होती.

आज सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधातील दोन्ही सदस्य पूर्ण संख्येने उपस्थित होते. लक्षवेधी, प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावरील विनियोजक विधेयक मांडण्यास सुरुवात केली. याला विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा विधान परिषदेतही जायचे असल्याचे सांगत हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले.

विधेयक मंजूर होताच मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांच्या बाजूने अचानक विश्वासदर्शक ठराव मांडला. यामुळे गोंधळलेल्या विरोधकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडताच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिले. तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी आवाजी मतदान घेत बहुमताने हा विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतरही अनिल गोटे यांनी कामकाजाचा मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहाचे कामकाज पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अविश्वास प्रस्ताव वाचून दाखवायचा प्रयत्न केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेताला. 21 जून 2006 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील अशाच प्रकारे त्यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला होता व तो मंजूर केला होता. आता विरोधी बाकांवर बसलेले तुम्ही सर्व त्या काळात मंत्रीपदावर होता. त्यामुळे हे पहिल्यांदा होतेय असे नाही. हा प्रघात तुम्हीच घालून दिला आहे. तुम्ही त्यावेळी केले ते कायदेशीर होते तेच आता आम्ही केले आहे. आता अविश्वास प्रस्तावावर चर्चा होउ शकत नसल्याचे फडणवीस म्हणाले. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी करायला सुरूवात केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)