फटफजितीमुळे पाकिस्तान नेमणार वकिलांचे नवे पथक

जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणी
इस्लामाबाद  – कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे जबरदस्त हादरा बसलेल्या पाकिस्तान सरकारवर देशातूनच सडकून टीका होत आहे. या फटफजितीमुळे पुढील सुनावणीवेळी बाजू मांडण्यासाठी वकिलांचे नवे पथक नेमण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणाऱ्या 46 वर्षीय जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा ठपका ठेऊन नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला भारताने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. त्या न्यायालयाने गुरूवारी शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. त्यामुळे भारताने याप्रकरणी पहिली फेरी जिंकली तर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यातून पाकिस्तानचे परराष्ट्र खाते स्वत:च्याच देशात चौफेर टीकेचा विषय बनले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी ब्रिटनस्थित वकील खावर कुरेशी यांची निवडही चुकीची ठरवली जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझिझ यांनी वकिलांचे नवे पथक नेमण्याचे सूतोवाच केले आहे. कुरेशी यांनी जोरदारपणे पाकिस्तानची बाजू मांडल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. मात्र, वकिलांचे नवे पथक नेमण्याच्या निर्णयातून पाकिस्तान सरकारने एकप्रकारे कुरेशी यांची निवड चुकल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)