फक्त शेतकऱ्यांचीच अडवणूक का?

आयोजित बैठकीत बोलताना पंकज देशमुख व समोर उपस्थित शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी

संघटना नेत्यांचा एसपीना सवाल; आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम
सातारा, दि.9(प्रतिनिधी)- शेतकरी काबाड कष्ट करून ऊस पिकवतोय. कारखानदार ऊस नेईपर्यंत शेतकऱ्यांशी गोड बोलतायत. मात्र जेव्हा दर देण्याची वेळ येते तेव्हा ते बोलत नाहीत. अशा वेळी आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्थेचा बडगा का दाखविला जातो? असा सवाल शेतकरी संघटना नेत्यांनी एसपी पंकज देशमुख यांना विचारला. दरम्यान, कारखान्यांनी मागील देणी द्यावीत व यंदाचा दर जाहीर करावा अन्यथा रविवारी चक्का जाम आंदोलन होणारच, असे देखील ठणकावून सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी दि.11 रोजी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शुक्रवारी सर्व शेतकरी संघटना नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक समीर शेख, प्रेरणा कट्टे यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला देशमुख यांनी संघटना नेत्यांची मते जाणून घेतली. यावेळी स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहीर न करता कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. शेतकरी एक तर उसनवारी करून उसाचे उत्पन्न घेतो. तो ऊस कच्चा माल म्हणून घेवून कारखानदार साखरेसह सहउत्पादने घेत आहेत. तसेच उसाची रिकव्हरी किती हे कारखानदारच ठरवून टाकतात. मात्र, उसाची बिले वेळेत ही देत नाहीत.त्यानंतर आंदोलने केल्यावर व्यवस्थित बिले अदा करण्यात येतात. दरवर्षी अशा प्रकारे आंदोलने करणे आम्हाला योग्य वाटत नाही. तसेच ऊस साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर कारखानदार हा व्यवसाय अडचणींचा असल्याचे सांगत आहेत. खरच हा व्यवसाय अडचणींचा असेल तर संचालकांनी पदावरून पायउतार व्हावे व प्रमुखपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमावा, अशी मागणी शेळके यांनी केली.
स्वाभिमानाचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, कारखान्यांनी दर जाहीर करावा. आम्ही रस्त्यावर येणार नाही. मात्र, दर न जाहीर करता कारखाने अन ऊस वाहतूक सुरू ठेवणार असाल तर आंदोलन हे होणारच आणि प्रसंगी गुन्हे देखील अंगावर घेण्याची आमची तयारी आहे. तसेच यावेळी मागील हंगामात जरंडेश्वर कारखान्याने 2900 रुपये दर जाहीर केलेला असताना केवळ 2650 रुपये दर दिला आहे. उर्वरित पैसे अद्याप अदा केले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर कारखानदारांनी ही सरकारला धोरण चुकत असल्याचे स्पष्ट सांगून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांनी केले. यावेळी रमेश पिसाळ, अर्जुन साळुंखे, शंकर शिंदे, विकास जाधव यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हिंसक आंदोलन केले तर बळाचा वापर करणार
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. तसेच संघटना नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने सांगावे. गैर मार्गाने आंदोलन केले तर नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील तसेच हिंसक पध्दतीने आंदोलन केले तर बळाचाही वापर करावा लागेल आणि होणाऱ्या आंदोलनादरम्यान पोलीस व शेतकरी नेते आमने सामने येतील तेव्हा अतिरेक होऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी संघटना नेत्यांना दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)