फक्त चकचकीत ‘लकी’

दिग्दर्शक संजय जाधव हे पहिल्यांदाच त्यांच्या लाडक्या कलाकारांशिवाय चित्रपट घेउन आले आहे. ‘लकी’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभय महाजन आणि दीप्ती सती अशी फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून ‘लकी’ मध्ये नेमके काय असेल याची कल्पना येते, सगळा काही चकचकीत असलेला हा चित्रपट आजच्या बोल्ड, बिनधास्त कॉलेजियन्ससाठी फुल मनोरंजक पॅकेज आहे.

‘लकी’ चित्रपटाची कथा ही लकी (अभय महाजन) भोवती फिरणारी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगा असलेल्या लकीच्या आयुष्यात सर्वकाही अनलकी सुरु आहे. गावाकडच्या लकीला मुंबईत जाऊन चित्रपट दिग्दर्शक व्हायचे आहे, त्यासाठी तो मास मीडियाच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतो. सातच्या आत घरात अशा वातावरणात वाढलेल्या लकीला मुंबईत कॉलेजची गुलाबी हवा खुणावू लागते. आपणही कोणाच्यातरी प्रेमात पडावे असे त्याला वाटते आणि तो जिया (दीप्ती सती) च्या प्रेमातही पडतो, मात्र एकतर्फी. दरम्यान लकीचा मित्र संकेत (मयूर मोरे) याच्या मतानुसार प्रेम म्हणजे केवळ शरीर सुख आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार झाले पाहिजे लकी संकेतच्या सल्ल्याने आपले प्रेम मिळवू पहात आहे, याच काळात त्याला एक संधी मिळते. मित्रांसोबत सहलीसाठी गोव्याला गेले असताना लकी त्याच्या व्याख्ये प्रमाणे प्रेम मिळविण्यासाठी धडपड करतो. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘लकी’ बघायला हवा.

दिग्दर्शक संजय जाधव यांची एक स्टाईल आणि चाहतावर्ग निर्माण झालेला आहे, त्यांच्या ‘येरे येरे पैसा’ प्रमाणेच हा ‘लकी’ डोक्याला शॉट न देता बघितला तर आंनद देतो. अतिशय वेगवान आणि विनोदी पद्धतीने सुरु असलेला चित्रपट मध्यंतरानंतर कथेला कलाटणी देण्याच्या प्रयत्नात मंद होतो. पटकथेतील गोंधळामुळे मध्यंतरानंतर चित्रपट दिग्दर्शकाच्या हातुनन निसटून जातोय असे अनेकदा जाणवते मात्र अरविंद जगताप यांचे खुसखुशीत संवाद चित्रपटाला पुन्हा आपल्या मार्गावर आणण्यासाठी पूरक ठरतात.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर लकीच्या भूमिकेत अभय महाजन याने कमाल केली आहे. प्रायोगिक नाटक, वेब सिरीज मधील गंभीर भूमिकेप्रमाणे  आपण विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावून नेऊ शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. दाक्षिणात्य चित्रपटानंतर मराठीत पदार्पण करणाऱ्या दीप्ती सतीने छान छान दिसण्याचे काम केले आहे. छोट्या भूमिकांमध्ये चेतन दळवी, शशांक शेंडे, मयूर मोरे, केतन मिसाळ यांच्यासह इतर कलाकारांनी भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाला अमित राज आणि पंकज पडघन यांचे संगीत दिले आहे. ‘तुझ्या नावातच आहे ल’, ‘माझ्याकडं बघतीया’ गाणी चकचकीत दिसतात.  चित्रपटाचे छायाचित्रण, तांत्रिक बाजू आणि एकूण सार्वक निर्मिती मुल्ये भक्कम आहेत. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही संजय जाधव यांच्या सिनेमाचे किंवा अभय महाजनचे चाहते असाल तर ‘लकी’ बघायला हरकत नाही.

चित्रपट – लकी
निर्मिती – बी लाइव्ह प्रोडक्शन्स, ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’
दिग्दर्शक – संजय जाधव
संगीत – पंकज पडघन
कलाकार – अभय महाजन, दीप्ती सती, मयूर मोरे, शुभांगी तांदळे, चेतन दळवी, शशांक शेंडे, पोर्णिमा अहिरे, निलेश दिवेकर
रेटिंग – ** 

– भूपाल पंडित

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)