प. पू. सेवागिरी महाराज रथोत्सव 2019 विशेष

सिद्धहस्त योगी संत सद्‌गुरु सेवागिरी महाराज

पुसेगाव, ता. खटाव येथील परमपूज्य सद्‌गुरू श्रीसेवागिरी महाराजांच्या 71 व्या पुण्यस्मरणानिमित्त आज शुक्रवार, दि. 4 जानेवारी रोजी रथोत्सवाचा कार्यक्रम होत आहे. त्या निमित्त…

श्री सेवागिरी महाराज हे सिद्धहस्तयोगी व आत्मसाक्षात्कारी संत पुसेगाव येथे होऊन गेले. पुसेगाव नाव उच्चारले कि सेवागिरी महाराजांचे नाव आपोआप तोंडात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुसेगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले ते केवळ सद्‌गुरू सेवागिरी महाराजांच्यामुळे. श्रीसेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने ही नगरी पावन झालीच व आधुनिक काळातील सुवर्णनगरी बनलेली आहे. पुसेगाव हे खटाव तालुक्‍यातील अध्यात्मिक, शैक्षणिक व औद्योगिक केंद्र बनले आहे.
पुसेगाव हे सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 36 किलोमीटरवर असलेले हे गाव. येरळा (वेदावती) नदी काठी श्रीसेवागिरी महाराजांचा मठ आहे. पूर्वेस ऐतिहासिक कटगुण गाव, दक्षिणेस रामेश्‍वराचा डोंगर, पश्‍चिमेस शिवकालीन वर्धनगड किल्ला, उत्तरेस सुमारे नेर तलाव व गर्द झाडीतील बुध गाव आहे. सातारा-पंढरपूर व औंध-फलटण रस्त्यांच्या मध्यभागी असल्यामुळे पुसेगावला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती या न्यायाने सिद्धहस्तयोगी तपोनिधी सेवागिरी महाराज, दशनाम पंतगिरी संप्रदायातील होत. ते अवधूत पंथी होत. शिवउपासना व दत्त उपासना ते करत असत. त्यांचे जन्मस्थान जुनागढ ते चारीधाम करून सन 1905 साली पुसेगावला आले व शंकराच्या आज्ञेने तेथे राहिले, असे त्यांनी लिहलेल्या शिलालेखावरून समजते. वयाच्या सातव्या वर्षी गिरनार पर्वतावर दशनाम पंथांची सन्यास दिक्षा घेतली. ते शिवकालीन होते. त्यांना सद्गुरू पूर्णगिरी महाराज यांची गुरुकृपा झाली. ज्ञानदेवाच्या भाषेत सांगायचे झाले तर एव गुरुक्रमे लाभले समाधी धनजे आपुले ते ग्रंथ बघुनी दिपले.

गोसावी मज त्यांनी त्यांच्याजवळ शिक्षण घेतले. साधना केली. गुरुंनी त्यांना बदिकाश्रम येथे पाठवले. त्यांचे मुळचे गाव शिवसिंग होते. त्यांनी नंतर चारीधामयात्रा, 12 जोतिर्लिंग, सप्तपुरी अशा यात्रा केल्या. नंतर ते कराचीला गेले व तेथे पुसेगावचे जोतीराम जाधव, बोंबाळे ता. खटाव येथील विठ्ठलकाका निंबाळकर यांच्याबरोबर सेवागिरी महाराज पुसेगावला आले. तो काळ म्हणजे 1905चा. पुसेगावला आल्यावर कोठे राहावे या विचारात होते. त्यांच्यासमोर दोन ठिकाणे होती. पुसेगाव व खातगुण. अखेरीस ईश्‍वरी प्रेरणेने येरळा नदीच्या काठी हेमाडपंथी सिद्धेश्‍वराचे मंदिर आहे. त्या मंदिरात त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी या सिद्धेश्‍वर मंदिराच्या सभोवताली निवडुंगाची दाट जंगले होती व मंदिरात मंदिरात जाण्यासाठी छोटीशी पाऊल वाट होती. मंदिराच्या मागील बाजूस संथपणे येरळा वाहत होती. अशा ठिकाणी त्यांचे मन रमले व तेथे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तेथे तपश्‍चर्या करून ध्यानस्थ राहू लागले. प्रत्येकवेळी ते भिक्षेसाठी ते बाहेर पडत असत. अलख… म्हणत भिक्षा दिली तर घेत. ते भोवतालच्या गावामधून फिरत असत. खातगुण, नेर विसापूर, फडतरवाडी, कटगुण येथे ही ते जात असत. ते जुन्या बुध रस्त्याला येरळा नदी व करंजओढा जेथे मिळतो अशा निसर्गरम्य ठिकाणी ध्यानस्थ बसत असत, असे आजही नेरमधील वयोवृध्द सांगतात. जे सिद्धहस्तयोगी व आत्मसाक्षात्कारी होत असल्याने ते स्वानंदात मग्न होत असत. सेवागिरी महाराजांचे व्यक्तिमत्व तेजापुंज होते. आनंदी व समाधानी मुद्रा होती. त्यांच्या वाणीत गोडवा होता. ज्ञानदेवाच्या भाषेत शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्यांची उंची 6 फुटांपेक्षा जास्त होती. शरीरयष्टी मजबूत, पिळदार होती. योगाचे तेज त्यांच्या कांतीवर झळकत होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर त्यांची छाप पडत असे.

ब्रम्हचर्य, वैराग्य, योग, साधना, ध्यास, नामस्मरण इत्यादी सुंदर अध्यात्मिक गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तीमत्वात एकवटला होता. ते जणू आनंद साम्राज्याचे चक्रवर्ती होते. त्यांच्या ठिकाणी शिस्त व वक्तशीरपणा होता. मंदिराची स्वच्छता ते स्वतः करत असत. त्यांना कुस्त्यांचा शौक होता. पुसेगावातल्या शेकडो तरुणांना त्यांनी कुस्त्या करण्यास व व्यायाम करण्यास प्रवृत्त केले. प्रोत्साहन दिले. ते स्वतः कुस्त्याच्या फडावर आवर्जून हजार राहत. आजही जुन्या काळातील त्या काळातील वयोवृध्द पैलवान व कुस्तीशौकीन लोक त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. त्यांनी मंदिराजवळ तालीम तयार केली व तरुणांना कुस्तीचे धडे दिले.

जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, वडूज विभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यावर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. मंदिराचे काम झाल्याने हे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, सेवागिरी महाराजांच्या जीवनांवर आधारित सेवागिरी महिमा कथा व आरती, या धार्मिक, ध्वनिफिती, मोठ्या प्रमाणावर यात्रेत विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.

रथोत्सवादिवशी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने यात्रेत स्वच्छतेबद्दल काळजी घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रथोत्सव यशस्वी करण्यासाठी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, सुरेश जाधव, सरपंच हेमा गोरे, उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)