प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करणार

मुख्याधिकारी विद्या पोळ : कागदी, कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन

वाई – केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय यांच्या आदेशावरून वाई शहरातील सर्व दुकानदार, मंडईतील भाजी विक्रेते, व्यवसायिक, हॉटेलवाले, औषधाचे मेडिकल दुकानदार, कापड दुकानदार तसेच कोणत्याही व्यापाऱ्यावर व ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या वापरावर पूर्णपणे बंदी करण्यात आली असून प्लास्टिक हद्दपार करण्याचा पालिकेने विडा उचलला आहे. शहरातील कोणत्याही व्यवसायिकाने प्लॅस्टिक पिशवीतून माल दिल्यास दुकानदारावर वाई नगरपालिका कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आदेश प्रत्येक दुकानदाराला नोटीसद्वारे देण्यात आले असून कागदी तसेच कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी केले आहे.

बंदीनंतर रस्त्यावर बसणारे छोटे व्यापारी लपून अजूनही प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गुटखा, तंबाखूयुक्त पानमसाला, इत्यादींच्या वापरातही प्लॅस्टीकचा वापर करण्यात येवू नये. न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाही करणे बंधनकारक असून त्याचे पालन करण्यास भाग पडावे लागणार आहे. तसे प्रबोधन करण्यात यावे, प्लॅस्टिक वापरल्यास तो न्यायालयाचा अवमान होवू शकतो, आणि ही अत्यंत गंभीर बाब ठरू शकते, न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक विक्रेता, उत्पादक, आणि नागरिक यांनी आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक व कर्तव्य आहे. प्लॅस्टीकचा होणारा कचरा हा पर्यावरणासह नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्यास अतिशय हानिकारक आहे.

प्लॅस्टिकमुळे शहरातील गटारे तुंबण्यास सुरुवात होते, कुजणे अथवा विरघळणे यासारखी कोणतीही प्रक्रिया प्लास्टिकवर होत नाही, प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, म्हणून प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशवी, कागदी पिशवीचा वापर विक्रेता आणि नागरिक यांनी करावा. कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा साठवणूक व वापर करताना आढळून आल्यास अशा उत्पादक, विक्रेता, व नागरिक यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दंड अथवा शिक्षा होवू शकते. याची नोंद घेवून प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळून वाई शहरातून प्लॅस्टिक हद्दपार करण्याचा विडा वाई नगरपालिकेने उचलला आहे. काही दिवसांपूर्वी काही व्यापाऱ्यांवर पालिकेने धडक कारवाई करून प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला होता. वाईकर नागरिकांमधून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्लास्टिकचा वापर टाळणे हे सर्वांचेच कर्तव्य
पर्यावरण बचावासाठी प्लॅस्टिक मुक्ती हा महत्वाचा पर्याय आहे. प्लॅस्टिक वापर टाळणे हे प्रशासनाबरोबर प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पाऊल उचलून नागरिकांमध्ये योग्य प्रबोधन करण्याची गरज आहे.
दिलीप डोंबवलीकर, दक्ष नागरिक, वाई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)