प्लॅस्टिक बंदी यशस्वी करूया (भाग 1)

डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

महाराष्ट्र सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. प्लॅस्टिकचा वाढत चाललेला विळखा थोपवणे ही काळाची गरज आहे. प्लॅस्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी आज सर्वत्र दिसून येऊ लागली आहे. जनावरांच्या पोटापासून ते पक्ष्यांच्या घरट्यांपर्यंत सर्वत्र प्लॅस्टिक आढळून येऊ लागले आहे. प्लॅस्टिक पिशव्यांना कापडी पिशव्या हा पर्याय आहे. मात्र त्या वापरणे बहुतेकांना, विशेषतः आधुनिक म्हणवणाऱ्या समाजाला गावंढळपणाचे वाटते. वास्तविक, प्लॅस्टिकचा वापर टाळणे हा पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने साफ नकार दिला आहे. प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालामुळे सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारचा आणि त्यानंतर आलेला न्यायालयाचा निर्णय हा स्वागतार्ह आणि पर्यावरणहितैषी आहे. प्लॅस्टिकच्या अतिवापरापेक्षा गैरवापरामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. आज प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर ही गरज वा सोय कमी आणि स्टाईल अधिक बनली आहे. साध्या औषधाच्या गोळ्या घेतल्या तरीसुद्धा लोक दुकानदारांकडे कॅरीबॅग मागतात आणि ती दिली नाही तर जोरजोरात भांडतात देखील. शेवटी दुकानदारही गिऱ्हाईक टिकवायचे असते म्हणून ते कॅरी बॅग देतात. बरेचदा या कॅरीबॅग इतक्‍या पातळ असतात की, घरी जाईपर्यंत त्या फाटतात आणि दुसऱ्या दिवशी त्या कचऱ्यासोबत उकिरड्यावर जातात. याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणावर होतो याचा विचार ना दुकानदार करतात ना ग्राहक ! त्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत योग्य आहे.

प्लॅस्टिक बंदी यशस्वी करूया (भाग 2)

प्लॅस्टिकचा सर्व प्रकारचा वापर रोखणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. याचे कारण आज प्लॅस्टिकचा वापर असंख्य वस्तूंमध्ये होत आहे. पेनामधील रिफिलचे उदाहरण घेतले तर पूर्वी आठ आण्याला सुटी रिफिल मिळत होती. आता ती प्लॅस्टिकच्या वेस्टनात मिळते. त्यामुळे तिचा आकर्षकपणा वाढला, किंमत वाढली पण पर्यावरणाचे नुकसानही वाढले. कारण रिफिल काढून घेऊन ते प्लॅस्टिक आवरण टाकून दिले जाते. अशा खूप साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत; परंतु त्यामध्ये पर्यावरणाचा विचार होताना दिसत नाही. आपण जे रेडिमेड कपडे विकत घेतो ते प्लॅस्टिकच्या पिशवीतच असतात. त्यामध्ये कॉलरजवळ, हातोप्यांवर प्लॅस्टिक लावलेले असते. अशा प्लॅस्टिकचे काय करायचे हा प्रश्‍न असतो. वस्तू आकर्षक दिसावी या विक्री कौशल्याच्या गरजेतून हे सर्व झाले आहे. त्यामुळे हा समग्र विचार होणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कागदाचा किंवा सुती कापडाचा वापर करता येणार नाही का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कागदाचे नैसर्गिकपणे विघटन होण्यास, नष्ट होण्यास पाच दिवसांचा कालावधी लागतो. सुती कापडाचे विघटन होण्यास पाच महिने लागतात. त्यामुळे या गोष्टी पर्यावरणपूरक आहेत. दैनंदिन व्यवहारात यांचा वापर वाढला पाहिजे.
प्लॅस्टिकचा सर्वाधिक वापर होतो कॅरीबॅगच्या स्वरूपात. खरे पाहिल्यास पूर्वीच्या काळी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर केला जात नव्हता. त्या काळात कापडी, कागदी पिशव्या लोक वापरत होते. परंतु कालांतराने प्लॅस्टिकच्या पिशव्यांची उपलब्धता वाढली आणि हा एक सोपा पर्याय आहे हे दिसल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही जास्त गैरवापर वाढला. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा फार मोठा धोका पर्यावरणाला आहे. आपण एक कागदी पिशवी वापरली तर हा कागद नैसर्गिक पद्धतीने नष्ट होण्यासाठी फक्‍त पाच आठवडे लागतात. त्याची कुजण्याची प्रक्रिया तात्काळ होते आणि त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून हानी होत नाही. कापडी पिशव्यांचे कापड नष्ट होण्यासाठी पाच महिने लागतात. ते कापड जमिनीखाली गाडून ठेवले तर पाच महिन्यांनी ते पूर्णपणे कुजते. त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून नुकसान होत नाही.प्लॅस्टिक पिशव्यांचे मात्र तसे नाही. सध्या ज्यापासून प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग बनवल्या जातात, ते प्लॅस्टिक नैसर्गिकपणे नष्ट होण्यासाठी निसर्गाला 500 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे ते नैसर्गिकपणे नष्टच होत नाही. साहजिकच ते पर्यावरणासाठी हानिकारक असते.

आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा समुद्र किनारी असणाऱ्या गावांमध्ये-शहरांमध्ये समुद्राच्या पाण्याचा तळ प्लॅस्टिकने झाकलेला आहे, इतका प्लॉस्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्‍याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. समुद्रात, नद्यांमध्ये राहणारे जलचर पाण्यात टाकलेले प्लॅस्टिक खाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे मृत प्राणी कापल्यानंतर त्यांच्या पोटात प्लॅस्टिक आढळल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना तेही प्लॅस्टिकच्या पिशवीसकट टाकले जाते. घरातील कचराही प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून कचरा कुंडीत टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जाते. कोल्हापुरात अशा मोकळ्या गायी किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लॅस्टिकचे कागद काढण्यात आले आहेत. म्हणजे आपल्या गैरवापरामुळे दुसऱ्याचा जीव जातो आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)