प्लॅस्टिक बंदी यशस्वी करूया (भाग 2)

डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

महाराष्ट्र सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. प्लॅस्टिकचा वाढत चाललेला विळखा थोपवणे ही काळाची गरज आहे. प्लॅस्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी आज सर्वत्र दिसून येऊ लागली आहे. जनावरांच्या पोटापासून ते पक्ष्यांच्या घरट्यांपर्यंत सर्वत्र प्लॅस्टिक आढळून येऊ लागले आहे. प्लॅस्टिक पिशव्यांना कापडी पिशव्या हा पर्याय आहे. मात्र त्या वापरणे बहुतेकांना, विशेषतः आधुनिक म्हणवणाऱ्या समाजाला गावंढळपणाचे वाटते. वास्तविक, प्लॅस्टिकचा वापर टाळणे हा पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार आहे.

एकूणच,प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाबरोबरच जीवितालाही धोका निर्माण झालेला आहे. निसर्ग अभ्यासक म्हणून मी आणखी एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे. आपल्या आजूबाजूला वावरणारे पक्षीही आज घरटे बांधताना प्लॅस्टिक वापरत असल्याचे दिसले आहे. या घरट्यांमध्येही मला प्लॅस्टिकचे कागद दिसले. म्हणजे नैसर्गिक पक्षी, प्राणीसुद्धा या वापराला तयार झाले की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. पण यामागचे खरे कारण असे आहे की, या पक्षांना ज्या गोष्टी घरटे बांधण्यासाठी आवश्‍यक आहे, तेच जर उपलब्ध होत नसेल आणि जिथे तिथे प्लॅस्टिकच दिसत असेल तर त्या पक्ष्यांचाही नाईलाज आहे. बुलबुल, चिमण्या यांच्या घरट्यात प्लॅस्टिक दिसू लागणे, इथपर्यंत प्लॅस्टिकचे आक्रमण वाढले असेल तर ते नक्‍कीच भनायक आहे. ही स्थिती बदलण्यासाठीचे एक अत्यंत सकारात्मक पाऊल म्हणून शासनाच्या निर्णयाकडे पहावे लागेल.

प्लॅस्टिक बंदी यशस्वी करूया (भाग 1)

या निर्णयाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला आणखी एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. सरकारमार्फत किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत याबाबत प्रबोधन केले जाणे आवश्‍यक आहे. तसेच माणूस म्हणून, नागरिक म्हणून आपले देखील याबाबत काही कर्तव्य आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कचऱ्यामध्ये सर्वांत मोठी समस्या आहे ती प्लॅस्टिकच्या पिशव्यांचीच. या पिशव्यांचा कचरा नष्ट होत नाही, त्यामुळे तो सर्वत्र पसरलेला दिसतो. त्यामुळे इतर अनेकसमस्या निर्माण होताना दिसत आहेत. गटारे साफ करत असताना त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्याच सापडतात. पावसाळ्यात ही सर्व गटारे तुंबली जातात. थोडासा जरी पाऊस पडला तरी त्यामुळे रस्त्यावर पाणी येणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे, सोसायट्यामध्ये पाणी जाणे हा प्रकार सर्वत्र दिसू लागला आहे. या परिस्थितीला प्लॅस्टिक आणि त्याचा वारेमाप वापर व टाकाऊ वृत्तीच कारणीभूत आहे. ही समस्या शहरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आज खेड्यातही प्लॅस्टिक कचऱ्यामुळे ओढे, नाले, गटारी तुंबलेली आढळतात. हे नियंत्रणात आणायचे असेल तर जनतेने प्राधान्याने प्लॅस्टिकच्या वापराबाबत विचार करायला हवा. यासाठी काही उपाय नक्‍कीच आहेत. आम्ही कोल्हापुरामध्ये निसर्गमित्र नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवतो. या संस्थेमार्फत गेली अनेक वर्षे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या तयार केल्या जातात. कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी एक साधा पर्याय सांगता येईल. घरामध्ये बऱ्याच साड्या पडलेल्या असतात. या साड्यांपासून आपण पिशव्या तयार करू शकतो. त्या घरच्याघरीही करता येतात किंवा

बाहेरून देखील शिवून आणता येतात. कॅरी बॅगचा वापर का करतो कारण ती घडी घालून आपल्याला सहजपणे ठेवता येते. पण आपण कापडी पिशव्यांचेदेखील असे करू शकतो. साड्यांच्या पिशव्या बनवून आपण नेहमीच्या कामासाठी बाहेर पडताना पर्समध्ये, गाडीच्या डिकीमध्ये ठेवल्या, खिशात ठेवल्या तरीही त्या चटकन वापरताही येतील. यामुळे नको असलेल्या साड्याही उपयोगात आणल्या जातात आणि मुख्य म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापरही टाळला जातो. त्यामुळे यातून दुहेरी फायदा होतो. केवळ साड्याच नव्हे तर घरातील कोणत्याही सुती कापडापासून अशा पिशव्या बनवता येतात. कोल्हापूरमध्ये आम्ही हा प्रयोग गेल्या दहा-बारा वर्षांपासून करत आहोत. इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती होते. तेथून कमी किमतीत मोठ्या प्रमाणात कापड घेऊन महिला बचत गटांकडून त्याच्या पिशव्या शिवून घेतल्या जातात. एका पिशवीसाठी अवघा एक -दोन रूपये खर्च येतो. कॅरी बॅगसाठीही आज तेवढे पैसे द्यावेच लागतात. उलट कापडी पिशवी बराच काळ तुमच्याकडे राहू शकते. ती अनेक वेळा वापरता येते आणि टाकून दिल्यानंतरही पर्यावरणाला तिच्यापासून धोका नसतो. त्यामुळे हा प्रयोग सर्वसामान्य जनतासुद्धा वैयक्‍तिक वा सामूहिक पातळीवर करू शकते. केवळ सरकारवर जबाबदारी न ढकलता सामान्य जनतेने हे केले पाहिजे. प्रत्येकाने मी कॅरी बॅगचा वापर करणार नाही, असा निर्धार केला तर या समस्येतून मुक्‍तता होईल.

पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पर्याय नव्हता, त्यावेळी कापडी पिशव्या वापरल्या जात होत्याच ना? मग आता का होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे आज मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून सामान आणणे हे मोठेपणाचे लक्षण वा फॅशन मानली जात आहे. अशा वेळी मॉल्सवाल्यांनी वा दुकानदारांनी कापडी पिशव्यांचा पर्याय निवडणे आवश्‍यक आहे. या कापडी पिशव्यांवर त्यांना त्यांची जाहिरातही करता येते. आम्ही असा प्रयोग केलेला आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात त्या ठिकाणी जाऊन आम्ही कागदी, कापडी पिशव्या दिल्या आणि लोकांनी त्या स्वीकारल्या देखील. याबाबतीत माझे अत्यंत चांगले अनुभव आहेत.

एका निरीक्षणानुसार, उच्चभ्रू लोकांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अधिक होतो. कारण त्यांना कापडी पिशवी घेऊन जाणे गावंढळपणाचे लक्षण वाटते. वास्तविक, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळणे हा गावंढळपणा नसून तो एक पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार आहे. प्लॅस्टिकचा एवढा अट्टाहास कशासाठी याचे उत्तर आपल्याकडे बोकाळत चाललेल्या “युज ऍण्ड थ्रो’ कल्चरमध्ये आहे. जागतिकीकरणानंतर आलेल्या नवअर्थकारणामध्ये आणि बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये “वापरा आणि टाका’ ही संस्कृती वेगाने पसरत गेली. तात्पुरतीच गरज भागवण्याची सवय जडू लागली. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग हे त्याचेच एक निदर्शक म्हणता येईल. पण हे निदर्शक आपल्या पर्यावरणाला घातक ठरत आहे.प्लॅस्टिकचे ग्लास, बाटल्या, प्लेटस्‌ यांचा वापर आपण कमी करू शकत नाही का, याचा लोकांनी विचार केला पाहिजे. लोक स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर करतात. पण त्यामुळे निसर्गावर, पर्यावरणावर, जीवसृष्टीवर, प्राणीमात्रांवर काय परिणाम होईल, याचा विचारच केला जात नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच प्लॅस्टिक बंदी गरजेचीच आहे. जनतेने हा निर्णय केवळ सरकारचा आहे असे न मानता तो पर्यावरणाच्या आणि पर्यायाने तुमच्या-आमच्या सर्वांच्या हिताचा आहे हे लक्षात घेऊन प्लॅस्टिक बंदी यशस्वी करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)