सातारा – राज्यात लागू असलेल्या प्लॅस्टिक बंदी अंतर्गत झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 85 कंपन्यांना बंदीची नोटिस पाठविण्यात आली आहे. बंदी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन तसेच ईपीआर (एकसटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी) कायद्याच्या अटी पूर्ण न केल्याबद्दल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उत्पादक कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात सातारा जिल्ह्यातील कंपन्यांचाही समावेश आहे.
प्लॅस्टिकमुळे होणारे गंभीर पर्यावरणीय दुष्परिणाम लक्षात घेता, राज्य सरकारतर्फे 23 मार्च रोजी राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली होती. या बंदीनुसार प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच बंदी नसलेल्या प्लॅस्टिक वस्तूंच्या उत्पादनासाठी ईपीआर क्रमांक आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील काही कंपन्यांकडून या बंदीची अंमलबजावणी केली जात नसल्याने, मंडळातर्फे अशा कंपन्यांवर धडक मोहिम राबवित त्यांचा प्लॅस्टिक माल जप्त करणे तसेच कंपन्यांच्या बंदीची कारवाई केली जात आहे.
मार्च 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत पुणे विभागातील सुमारे 85 प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना बंदीची नोटिस पाठविण्यात आली आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, सातारा अशा विविध परिसरातील कंपन्यांचा सहभाग आहे.
प्लॅस्टिक बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठीच मंडळातर्फे ही कारवाई केली जात आहे. बंदीचे आदेश दिलेल्या कंपन्यांची वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
यापुढेदेखील ही कारवाई चालूच राहणार असल्याचे माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे यांनी दिली. दरम्यान, ईपीआर कायद्याबाबत अस्पष्टता असल्याने त्याअंतर्गत केली जाणारी कारवाई चूकीची असून, यासंदर्भात अधिक स्पष्ट मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात, तसेच जोपर्यंत या कायद्यात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदीचे आदेश मागे घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा