प्लॅस्टिकबंदी मोहिम थंडावली

मनुष्यबळाचा अभाव : महापालिकेकडूनही सहकार्य नाही

पुणे  – मोठ्या धुमधड्याक्‍याने राज्यात लागू करण्यात आलेली प्लॅस्टिकबंदीची मोहिम थंडावली आहे. या बंदीअंतर्गत गेल्या अडीच महिन्यांत एकही कारवाई झाली नसून, मनुष्यबळाचा अभाव आणि महापालिकेकडून मिळत नसलेले सहकार्य यामुळे या कारवाईत अडचणी येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता, राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी वजन असलेल्या, “सिंगल युझ’ प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. जूनपासून लागू झालेल्या या बंदीनंतर मोठ्या धड्याक्‍यात कारवाईचा सपाटा सुरू झाला होता. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्तपणे कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकून प्लॅस्टिकचा माल जप्त केला होता. मंडळाच्या नोंदीनुसार एकट्या पुण्यात या बंदीअंतर्गत 1 लाख 80 हजार रुपयांचा प्लॅस्टिक माल जप्त करण्यात आला असून, सुमारे 13 कंपन्यांना बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत प्लॅस्टिक विरोधी कारवाई बरीच थंडावली असून, दरम्यानच्या काळात एकही कारवाई झाली नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

प्लॅस्टिक बंदीची कारवाई ही एक व्यापक स्वरुपाची कारवाई आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. मात्र, मंडळाकडे त्या प्रमाणात मनुष्यबळ नाही. तसेच, यासंदर्भात महापालिकेचेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळेच इच्छा असूनही प्लॅस्टिकबंदीबाबत व्यापक कारवाई होत नाहीये.

– दिलीप खेडकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

 प्लॅस्टिक कारवाई म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. कारवाईअंतर्गत जप्त होणारा माल अधिक असतो. दंडदेखील जास्त घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात नोंद कमी माल आणि रकमेची केली जाते. तसेच, या कारवाईची पोलिसांकडे नोंद नसल्याने व्यापाऱ्यांना न्यायालयातही दाद मागणे मुश्‍किल होत आहे. त्यामुळे या कारवाईबाबत पुनर्विचार होणे आवश्‍यक आहे.

– सचिन निवंगुणे, रिटेल व्यापारी असोसिएशन

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)