150 किलो साहित्य जप्त : दोघांकडून 10 हजार रु. वसूल
पुणे – प्लॅस्टिक बंदीअंतर्गत कॅंटोन्मेंट बोर्डाने लष्कर परिसरात धडक कारवाई केली. यात सुमारे 150 किलो प्लॅस्टिक साहित्य ताब्यात घेतले असून व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती बोर्ड प्रशासनाने दिली.
प्लॅस्टिक बंदीअंतर्गत महापालिकेने शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई करून प्लॅस्टिक जप्त केले. महापालिकेपाठोपाठ आता कॅन्टोनमेंट बोर्डानेही प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू केली. लष्कर परिसरात मोहिमेदरम्यान, बुटी स्ट्रीट परिसर, महात्मा गांधी रस्ता, शिवाजी मार्केट परिसरातील दुकानांची तपासणी करून 100 ते 150 किलो प्लॅस्टिक ताब्यात घेण्यात आले. तसेच व्यापाऱ्यांकडून प्राथमिक दंडापोटी एकूण 10 हजार रुपये वसूल करण्यात आले.
बंदी घातलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणाऱ्यांवर 5 ते 25 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची शिक्षा होणार आहे. या निर्णयाची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) नुकतीच राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तीन अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर लगेचच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या सूचनेनुसार गुरुवारी आरोग्य निरीक्षक आर. टी. शेख यांच्या नेतृत्त्वाखाली प्लॅस्टिकबंदीसाठी धडक कारवाई मोहिम राबविण्यात आली.
प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे. प्लॅस्टिक पिशव्या व वस्तूंमुळे नद्या, नाले, गटारे तुंबत असून त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे. प्लॅस्टिक विल्हेवाटीचा ताणही कचरा डेपोवर येत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी बोर्ड हद्दीतील नागरिकांनी प्लॅस्टिक वापरू नये.- संजय झेंडे, आरोग्य विभागप्रमुख, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा