प्लॅस्टिकचे उत्पादन करणाऱ्या 16 कंपन्यांवर बंदी

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई : 1328 दोषी व्यावसायिकांकडून 19 लाख 72 हजारांचा दंड वसूल
– सुमारे 85 टन प्लास्टिक जप्त
लोणावळा – महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिक बंदीचा अध्यादेश जारी केल्यानंतर आजवर एकट्या पुणे प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 16 प्लॅस्टिक उत्पादन निर्मात्या कंपन्यांवर बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर याच प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक वापरा विरोधात करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवाईमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक हजार 328 व्यवसायिकांना दोषी ठरविण्यात येऊन त्यांच्याकडून तब्बल 85 टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. शिवाय या दोषींकडून 19 लाख 72 हजार 319 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंबप्रसाद गंधे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे प्रादेशिक विभागामधील पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वरील कारवाई करण्यात आली आहे. याच वर्षी 23 मार्च रोजी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर सुरवातीच्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक उत्पादनाची निर्मिती करणारे निर्माते, साठवणूकदार आणि विक्रेते यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकट्या पुणे प्रादेशिक विभागामध्ये 133 उद्योगांची तपासणी केली. यात बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या एकूण 16 कंपन्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने स्वतंत्ररित्या 339 दुकानांची तपासणी केली. या तपासणीत दोषी आढलेल्या 83 दुकानदारांकडून 3 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल करीत साधारण 11 टन प्लॅस्टिक जप्त केले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईमध्ये 83 हजार 817 दुकाने तपासण्यात आली. यात दोषी आढळलेल्या एक हजार 245 दुकानदारांकडून 15 लाख 82 हजार 319 रुपयांचा दंड वसूल करीत साधारण 74 टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. यातही प्रामुख्याने पंढरपूर आणि आळंदी सारख्या देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या कारवाया झाल्या.

पंढरपूरमधून दोन टन तर आळंदीमधून दीड टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंबप्रसाद गंधे यांनी दिली.

लोणावळा शहरातून दीड टन प्लॅस्टिक जप्त;
सहा व्यावसायिकांकडून 30 हजारांचा दंड वसूल
पर्यटननगरी लोणावळा शहरातून शुक्रवारी (दि.5) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्लॅस्टिक विरोधी कारवाईमध्ये सुमारे दीड टन प्लॅस्टिक आणि बंदी असलेली प्लॅस्टिक उत्पादने जप्त करण्यात आली. शिवाय सहा दोषी व्यावसायिकांकडून 30 हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. शहरातील एकूण 25 दुकान, हॉटेल्स आणि स्टॉकिस्ट या कारवाईमध्ये तपासण्यात आले. या कारवाईमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंबप्रसाद गंधे, क्षेत्र अधिकारी डॉ.अरविंद धपाटे, लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पवार आणि नगरपरिषदेचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)