प्लॅस्टिकचा विळखा…

विनोद पद्मनाभन 

राज्य सरकारने गुढी पाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाची हानी पोचवणाऱ्या आणि नागरी व्यवस्था बिघडून टाकणाऱ्या प्लॅस्टिकवर जालीम उपाय करण्यासाठी अनेकप्रकारच्या योजना आखण्यात आल्या आहेत. मात्र आतापर्यंत कोणत्याच राज्यात त्यास फारसे यश मिळाले नाही. अभियानाला येणारे अपयश पाहता प्लॅस्टिकला पर्याय तयार करणे गरजेचे होऊन बसले आहे. यातूनच इकोफ्रेंडली कॅरिबॅग तयार करून काही प्रमाणात पेट्रोकेमिकल प्लॅस्टिकच्या अतिवापराला लगाम घालता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

प्लॅस्टिकची घुसखोरी ही आपल्या आयुष्यावर आणि जगावर खोलवर परिणाम करणारी आहे. इच्छा नसतानाही आपल्याला प्लॅस्टिकचा आधार घ्यावा लागतो. मात्र हेच प्लॅस्टिक आता जगाच्या मुळावर उठले आहे. प्रदूषणाचा सर्वात मोठा गुन्हेगार म्हणून याकडे पाहिले जाते. असेही म्हटले जाते की, प्लॅस्टिकचा जन्म होतो, परंतु मरत नाही. मानवाने तयार केलेली ही वस्तू अमर ठरली आहे. प्लॅस्टिक येण्यापूर्वी आपण अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर करत होतो, की त्या कालांतराने नष्ट होत होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात त्या वस्तू विलीन होत होत्या. मात्र प्लॅस्टिकच्या आगमानानंतर चित्रच बदलले गेले. प्लॅस्टिकचा सर्वात मोठा वाईट गूण असा की, ते कधीही नष्ट होत नाही. प्लॅस्टिक खाणारे एकही किटक अस्तित्वात नाही.

मूळ रूपात प्लॅस्टिक हे पेट्रोलियम पदार्थापासून तयार होते. त्याचे विघटन होत नाही. रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेल्या प्लॅस्टिकमध्ये कोणत्याही प्रकारचे ऑक्‍सिजन नसते. त्यामुळे त्याचे जीवांशी काही देणेघेणे नसते. त्याला जाळून नष्ट करणे हे देखील खूप धोकादायक आहे. कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशवीला जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातून विषारी गॅस निघतो. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. प्लॅस्टिक जाळले नाहीतरी त्याचा परिणाम कालांतराने का होईना होतोच. प्लॅस्टिकच्या दुष्परिणामामुळे मावळते शतक हे प्लॅस्टिकचे नाही तर कधीही नष्ट न होणारा कचऱ्याचे शतक म्हणून ओळखले जाईल, असे म्हटले जात आहे. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे शहरात बकालपणा वाढला आहे. सर्वात म्हणजे प्लॅस्टिकमुळे नाल्या तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय जनावराच्या पोटात प्लॅस्टिक गेले तर त्याच्या मृत्यूला कारणीभूतही ठरत आहे. अर्थात प्लॅस्टिक हे बहुपयोगी आहे, हे तितकेच खरे. हे सर्वात स्वस्त आणि वापरण्यास सुलभ असणाऱ्या प्लॅस्टिकची लोकप्रियता कमी कालावधीत वाढली आहे. आपल्या घरात अशी कोणतीच वस्तू नाही की ती प्लॅस्टिक नसेल. मग बाथरुममधील बकेट असो किंवा भाजी आणण्यासाठी वापरण्यात येणारी कॅरिबॅग असो.

प्लॅस्टिकचे डबे, बकेट आल्यामुळे घरात वर्षानुवर्षे वापरण्यात येणाऱ्या वजनदार बादल्या, घागरी उचलण्याची परंपरा कालबाह्य झाली. एखाद्या वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी प्लॅस्टिकशिवाय अन्य दुसरा पर्याय सापडलेला नाही. खाद्यपदार्थ, गिफ्ट आदींचे आयुष्यमान वाढवण्याचे काम प्लॅस्टिकने केले आहे. यामुळे दूरवर अन्न पाठवणे सोपे आणि सुरक्षित झाले, हे तितकेच खरे. प्लॅस्टिकच्या 200 ग्रॅमच्या कॅरीबॅगमध्ये पाच किलोपर्यंतचे धान्य सहजपणे नेऊ शकतो आणि ही पिशवी आपल्याला कधीही नाराज करणार नाही. या कारणामुळेच आपण अनेक वर्षांपासून प्लॉस्टिकमुक्‍त अभियान राबवत असूनही तडीस जाताना दिसून येत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये तर दोन दशकांपासून प्लॅस्टिक बंदी आहे. मात्र त्याठिकाणीही ही मोहीम फिकीच पडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टिकला अजूनही ठोस पुरावा सापडलेला नाही. मात्र त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि अपेक्षाही केली जात आहे. यॉर्क विद्यापीठाचे ग्रीन केमेस्ट्री सेंटर वनस्पतीपासून प्लॅस्टिक तयार करत आहे. त्याच्यात ऑक्‍सिजन घटकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे ही कॅरिबॅग संपूर्णपणे बायो-डिग्रेडेबल असणार आहे. मात्र त्यात टिकावू आणि मजबूतपणा असेल याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. शास्त्रज्ञांना पहिल्या टप्प्यात यश मिळाले आहे. मात्र खरी परीक्षा पुढेच आहे, जेव्हा बाजारातील उपलब्ध कॅरिबॅगशी नवे इकोफ्रेंडली प्लॅस्टिक स्पर्धा करेल आणि पेट्रोकेमिकल प्लॅस्टिकवर हर्बल प्लॅस्टिक मात करेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)