प्रो कबड्डी लीग : यू मुंबाची हरयाना स्टीलर्सवर मात

अनुप कुमार, श्रीकांत जाधव यांची चमकदार कामगिरी
प्रभात वृत्तसेवा
पुणे – कर्णधार अनुप कुमार आणि अव्वल आक्रमक श्रीकांत जाधव यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर यू मुंबा संघाने हरयाना स्टीलर्स संघाचा पराभव करताना प्रो कबड्डी लीग स्पर्धेत चमकदार विजयाची नोंद केली. पूर्वार्धातील ढिसाळ कामगिरी आणि बचावफळीच्या अक्षम्य चुकांची पुरेपूर किंमत हरयाना स्टीलर्स संघाला मोजावी लागली. त्यामुळेच यू मुंबा संघाला हा सामना 38-32 असा जिंकता आला.

अनुप कुमार आणि श्रीकांत जाधव यांनी मिळून 14 गुणांची कमाई करताना यू मुंबा संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यात अनुप कुमारने एकट्याने 8 गुणांची कमाई केली. हरयाना स्टीलर्स संघाकडून विकास कंडोलाने एकट्याने 9 गुण मिळविले. परंतु संघाचा पराभव टाळण्यात त्याला यश मिळाले नाही. आता यू मुंबा संघाचे 10 सामन्यांमधून 24 गुण झाले असून त्यांनी तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. त्याच वेळी हरयाना स्टीलर्स संघाने सात सामन्यांतून 23 गुणांची कमाई करीत चौथे स्थान राखले आहे.

त्याआधी दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना दोन मिनिटांनंतर 2-2 अशी बरोबरी साधली होती. परंतु श्रीकांत जाधवने यशस्वी चढाई करताना यू मुंबा संघाला पाचव्या मिनिटाला 5-2 अशी आघाडी मिळवून दिली. अनुप कुमारने त्याची पुनरावृत्ती करताना यू मुंबा संघाला सहाव्या मिनिटालाच 7-2 असे आघाडीवर नेले.

विकतास कंडोलाने दोन गुण मिळविताना हरयाना स्टीलर्सला दिलासा दिला. परंतु काशिलिंग आडकेने त्याची भरपाई लगेचच केली आणि नवव्या मिनिटाला यू मुंबा संघाने पुन्हा आघाडी घेतली. इतकेच नव्हे तर यू मुंबा संघाने 11व्या मिनिटालाच हरयाना स्टीलर्सवर पहिला लोण चढविला व 15-10 अशी आघाडी घेतली. श्रीकांत जाधवने ही आघाडी 18-10 अशी वाढविली. परंतु हरयानाने पाच मिनिटांत तीन गुण मिळविताना पिछाडी कमी केली. तरीही मध्यंतराला यू मुंबा संघाकडे 20-15 अशी आघाडी होती.

उत्तरार्धातही यू मुंबा संघाने आपले वर्चस्व कायम राखले व 22व्या मिनिटाला 23-16 अशी आघाडी घेतली. परंतु हरयाना स्टीलर्सने यू मुंबा संघावर पहिला लोण चढविताना आपली पिछाडी 22-25 अशी कमी केली. हरयानाने काशिलिंग आडकेची पकड करताना आपली पिछाडी 25व्या मिनिटाला केवळ एका गुणावर आणली. इतकेच नव्हे तर 29व्या मिनिटाला सामना 29-29 असा बरोबरीत आला. मात्र यू मुंबा संघाने चमकदार पकडी करताना लवकरच 34-30 अशी आघाडी घेतली.

श्रीकांत जाधवने 36व्या मिनिटाला चढाईत गुण मिळविला, तर बचावफळीनेही चमकदार कामगिरी करताना अखेरच्या पाच मिनिटांत आपले वर्चस्व कायम राखून 38-32 अशी बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)