प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणचा यू मुंबावर विजय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणेरी पलटण संघाने यू मुंबा संघावर पिछाडीवरून मात करताना प्रो कबड्डी लीग स्पर्धेत रोमांचकारी विजयाची नोंद केली. मेराज शेख आणि अबुल फाझल या इराणी खेळाडूंनी मिळून केलेल्या अफलातून कामगिरीमुळे पुणेरी पलटण संघाला यू मुंबा संघाचा 25-24 असा केवळ 2 गुणांनी पराभव करता आला.

पुणेरी पलटण आणि यू मुंबा या दोन्ही संघांना विजयाची नितांत गरज असल्यामुळे हा सामना रंगतदार होणार याची सर्वांना खात्री होती आणि प्रत्यक्षातही तसेच घडले. यू मुंबा संघाचा प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील हा पाचवा पराभव ठरला. त्यांचे आता 8 सामन्यांतून 18 गुण झाले असून पुणेरी पलटण संघाचे 7 सामन्यांतून 26 गुण झाले आहेत. पुणेरी पलटण संघाच्या दीपक हूडाला सामन्यातील सर्वोत्तम चढाईपटू हा पुरस्कार देण्यात आला.

त्याआधी पुणेरी पलटण संघाने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला चढाईत गुण मिळवून आपले खाते उघडले. दीपक हूडाने या वेळी कौशल्यपूर्ण चढाई करताना यू मुंबाच्या बचावफळीला चकविले. परंतु श्रीकांत जाधवने चढाईत दोन गुणांची नोंद करताना यू मुंबा संघाला पाच मिनिटांनंतर 3-3 अशी बरोबरी साधून दिली. इतकेच नव्हे तर यू मुंबाच्या खेळाडूंनी एकामागून एक असे गुण मिळविताना आपल्या संघाला 14व्या मिनिटाला 11-4 अशी भरभक्‍कम आघाडी मिळवून दिली.
दीपक हुडाने चढाईत आपला तिसरा गुण मिळविला तेव्हा पुणेरी पलटण संघ 5-11 असा पिचाडीवर होता. काशिलिंग आडकेने एकाच चढाईत दोन गुण मिळविताना यू मुंबा संघाला 15-6 असे आघाडीवर नेले. पूर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला पुणेरी पलटण संघाने तीन गुण मिळविले. त्यामुळे मध्यंतराला यू मुंबा संघाकडे 15-9 अशी आघाडी राहिली होती.
उत्तरार्धात मात्र सामन्याचे पारडे फिरले. संदीप नरवालने एका चढाईत दोन गुण मिळविल्यामुळे पुणेरी पलटण संघाला पिछाडी 11-17 अशी कमी करता आली. दोन्ही संघ एकाआड एक असे गुण मिळवीत असताना यू मुंबा संघाने 35व्या मिनिटाला दीपक हूडाची पकड करीत 22-20 अशी आघाडी राखली. मात्र पुणेरी पलटण संघाने 38व्या मिनिटाला अप्रतिम पकड करताना सामन्यात पहिल्यांदाच 24-23 अशी आघाडी मिळविली.

यू मुंबा संघाने 39व्या मिनिटाला 24-24 अशी बरोबरी साधल्यामुळे सामन्यातील रंगत कळसाला पोहोचली. परंतु पुणेरी पलटण संघाने पुन्हा एकदा उत्कृष्ट पकड करताना 25-24 अशी आघाडी मिळविली आणि अखेरच्या क्षणी गुण मिळविताना 25-24 अशी बाजी मारली. मध्यंतराला 9 गुणांनी पिछाडीवर असलेल्या पुणेरी पलटण संघाने उत्तरार्धात अफलातून कामगिरी करताना रोमांचकारी विजयाची नोंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)