प्रोफाईल अपडेट आदेशाला “केराची टोपली’

विद्यापीठ महाविद्यालयांवर कारवाई करणार का ?

– डॉ.राजू गुरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वेबसाईटवर विविध माहितींचा समावेश असलेली “प्रोफाईल’ अपडेट करण्याबाबत महाविद्यालयांना वारंवार आदेश बजाविले आहेत. मात्र, महाविद्यालयांकडून त्याची गांभीर्याने दखलच घेतलेली दिसत नाही. बहुसंख्य महाविद्यालयांनी प्रोफाईलमध्ये नवीन माहिती अद्यापही अपडेटच केलेली नाही.

पालक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था या सर्वांना घरबसल्या ऑनलाईन सर्व आवश्‍यक ती माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून सर्वच कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. पुणे विभागात 167 अनुदानित व 296 विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. महाविद्यालयीन स्तरावरही ऑनलाईन कामकाज व्हावे, यासाठी विद्यापीठाकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू असतात. महाविद्यालयांनी सर्व माहिती ऑनलाईन पाठवावी याबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयांना अनेकदा लेखी सूचनाही बजाविण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर “बीसीयुडी’ ऑनलाईनवर महाविद्यालयांनी आपले “प्रोफाईल’ भरणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रोफाईलवर नियमितपणे माहिती अपडेटच केली जात नसल्याचे आढळून येते.

महाविद्यालयांनी प्रोफाईलवर सर्व महत्त्वपूर्ण माहिती नमूद करणे आवश्‍यक आहे. विविध विद्याशाखा, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पातळी, विद्यार्थी प्रवेश क्षमता, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, मान्यता घेतलेले सामान्य व विशेष विषय याबाबतची माहिती प्रोफाईलमध्ये समाविष्ट केलेली असते. बऱ्याचशा महाविद्यालयांचे प्राचार्य, अपिलीय अधिकारी, माहिती अधिकारी हे बदलेले आहेत. मात्र, वेबसाईटवर नवीन नावाऐवजी जुन्याच व्यक्तींची नावे अद्याप कायम दिसतात. प्राध्यापकांची विषयनिहाय माहिती, सोयीसुविधा, वार्षिक आर्थिक ताळेबंद याबाबतची माहितीही अपडेट नसल्याचे आढळून येते.

स्थलांतरित महाविद्यालयांची माहिती अपडेट नाही
नव्याने नेमलेल्या प्राध्यापकांची नावे जाणूनबुजून प्रोफाईलवर भरली जात नाहीत. महाविद्यालयात उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांबाबत खऱ्या नोंदी केल्याचे प्रमाण खूपच कमी आहे. वार्षिक आर्थिक ताळेबंदात जमा व खर्चाचा तपशील नोंदविणे आवश्‍यक आहे. मात्र, त्याची पूर्ण माहितीच भरली जात नाही, असे प्राध्यापक, कर्मचारी यांच्याकडूनच समजले आहे. काही महाविद्यालये नवीन जागेत स्थलांतरित झालेली आहेत. मात्र, वेबसाईटवर त्यांचे जूनेच पत्ते कायम आहेत. लॅंडलाईन फोन व फॅक्‍सही बंदच असतात. यामुळे पालक, विद्यार्थी, विद्यापीठ कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. महाविद्यालयांनी प्रोफाईल नियमित अपडेट केल्यास ऑनलाईन परिपूर्ण माहिती मिळेल व यातून आमचा त्रास कमी होईल, असे अनेकांकडून सांगण्यात येत असते.

“त्या’ महाविद्यालयांवर कारवाई कधी?
विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती ऑनलाईनच भरावी लागते. मात्र, प्रोफाईलच अपडेट नसल्याने या योजना राबवितानाही अडचणी येत असतात. शासन व विद्यापीठाने वारंवार प्रोफाईल अपडेट करण्याबाबतच्या सूचना महाविद्यालयांना अनेकदा बैठकांमध्ये दिलेल्या आहेत. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांनी त्याची दखलच घेतलेली दिसत नाही. प्रोफाईल अपडेट नसलेल्या महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून नेहमी कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, प्रत्यक्षात काहीच कारवाई होताना आढळत नाही. आता तरी विद्यापीठ या महाविद्यालयांवर कारवाई करणार का, असा प्रश्‍नही सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)