“प्रोटोकॉल’वरुन विरोधी पक्षनेत्यांचा संताप!

पिंपरी – सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून विरोधी गटातील नगरसेवक अथवा पदाधिकाऱ्यांना सभा, समारंभ अथवा विविध विकासकामांच्या उद्‌घाटनांमध्ये डावलण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा नाही. मात्र, आता विरोधी पक्षनेता असलेल्या दत्ता साने यांनाही विकास कामांच्या उद्‌घाटनांमध्ये डावलले जात असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये गुरुवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमांना विरोधी पक्षनेता म्हणून दत्ता साने यांना निमंत्रित करण्यात आले नाही. परिणामी, संतापलेल्या साने यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापालिकेचा शिष्टाचार (प्रोटोकॉल) काय सांगतो? तुम्ही राजकीय दबावाखाली काम करता काय? असा प्रश्‍न उपस्थित करुन संबंधित अधिकाऱ्यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांत एकमधील सदर विकास कामांचे भूमिपूजन, उद्‌घाटनाच्या कार्यक्रमांस संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्पर मला कुठल्याच प्रकारची पूर्व सूचना दिली नाही. मी नगरसदस्य आणि विरोधी पक्षनेता या पदावर कार्यरत आहे. विरोधी पक्षनेत्यांनाच जर अशी वागणूक मिळत असेल, तर इतर नगरसदस्यांचे काय? महापालिकेत शिष्टाचार (प्रोटोकॉल) नावाची गोष्टच राहिली नाही. सदरची बाब अतिशय गंभीर असून, महापालिकेचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असा आरोपही साने यांनी केला आहे.

तसेच, गुरुवारी केल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना टाळण्यात आलेबाबत आपण सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी केली आहे.

चिखलीतील “एसटीपी’ला विरोध
महापालिकेच्या वतीने चिखली येथे रिव्हर रेसिडेंन्सीच्या मागील बाजूस मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे (एसटीपी) काम सुरु आहे. परंतु, या परिसरातील विशेषत: रिव्हर रेसिडेंन्सी, ऐश्वर्यम, स्वराज, स्पारा, क्रिस्टल व क्‍लॉलेस्स सोसायटीमधील नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प पूररेषा निळी व लालरेषा अंतर्गत येत असल्याने प्रस्तावित एसटीपी प्लॅंट हा अनधिकृत आहे. महापालिका अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई करीत असताना स्वत: अवैध बांधकाम करीत आहे. हा प्लॅंट झाल्यास या परिसरातील नागरिकांना भविष्यात अनेक समस्यांना सामारे जावे लागेल. वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, पर्यावरण हानी, आरोग्याच्या समस्या उद्‌भवणाऱ्या असल्यामुळे या परिसरातील नागरिकांचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे. त्यामुळे या प्लॅंटचे काम त्वरित बंद करावे, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)