प्रॉपर्टीच्या दरांवर परिणाम करणारे घटक

रियल इस्टेट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी मालमत्तेच्या योग्य किमतीचा अंदाज करण्यासाठी या सर्व घटकांचा अतिशय बारकाईने विचार करायला हवा. जे घर घेणार त्याची काळजीपूर्वक तपासणी करा, योग्य तऱ्हेने अभ्यास करा. गरज भासल्यास ती मालमत्ता विकली जाते की नाही याची चाचपणी करा आणि मग गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

प्रॉपर्टीच्या किमती वाढणे किंवा कमी होणे हे केवळ प्रॉपर्टीच्या मागणीवर अवलंबून नसते. त्याला प्रॉपर्टीची जागा, त्याभोवती राहणारे लोक, व्याज दर आणि अर्थव्यवस्था यासारखे इतरही घटक कारणीभूत असतात. अशा कारणांचा घेतलेला आढावा-

जागा
व्यापार आणि बाजाराच्या ठिकाणी जर इमारत, जागा किंवा मालमत्ता असेल तर त्याची किंमत इतर रहिवाशी ठिकाणच्या मालमत्तेच्या तुलनेत चढलेली असते. चांगल्याप्रकारे विकसित झालेल्या, मंजुरी असलेल्या वसाहती आणि क्षेत्रातील इमारतींचे, घरांचे दर हे कमी विकसित आणि विकसनशील क्षेत्रांच्या तुलनेत अधिक सांगितले जातात. त्याचबरोबर वादात नसलेल्या जागेवरील इमारतीचे दरही वादग्रस्त जमिनीवर असलेल्या इमारतीच्या तुलनेत जास्त असतात.

सोयीसुविधा
त्याचप्रमाणे ज्या प्रॉपर्टीमध्ये मुलभूत सुविधा व्यवस्थित देण्यात आल्या असतील त्या प्रॉपर्टीची किंमत जास्त असते. ज्या इमारतीत वीज, टेलिफोन, सांडपाणी व्यवस्था योग्य तऱ्हेने दिली गेली नसेल त्या प्रॉपर्टीकडे अर्थातच ग्राहक दुर्लक्षच करतात किंवा किंमत पाडून मागतात. शेवटी प्रत्येकासाठी घर ही आयुष्यभराच्या निवाऱ्याची बाब असते. त्यामुळे मुलभूत सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात अशीच ग्राहकांची अपेक्षा असते. शिवाय लाखो रूपये खर्च करून प्रॉपर्टी खरेदी केलेली असते. अशा वेळी या सुविधा नसतील तर ग्राहक अशा प्रॉपर्टीकडे पाठच फिरवतील.

इन्फ्रास्ट्रक्‍चर किंवा अंतर्गत सुविधा
अंतर्गत सुविधा विकास हा आपल्या देशातील रियल इस्टेटच्या किमतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. रस्ते, विमानतळ, फ्लायओव्हर्स, मॉल्स आणि बस स्टॅंड आणि इतर सुविधा प्रॉपर्टीच्या जवळ असतील तर तिची किंमत वाढायला मदत होते. अलीकडच्या काळात गजबजलेल्या ठिकाणी घर घेण्यापेक्षा गावाबाहेर शांत ठिकाणी घर घेण्याचाही विचार अनेक लोक करतात. अशा ठिकाणीही रस्त्यासारख्या सुविधा आहेत की नाही याकडे लक्ष दिले जाते. अनेक लोक शाळा, कॉलेज, ऑफिसेस जवळ आहेत का याचाही विचार प्रॉपर्टी खरेदी करताना करतात. बाजार, सरकारी कार्यालये, मंदिरे घराजवळ असावीत, असेही काहींना वाटते. या अपेक्षा ज्या प्रॉपर्टी पूर्ण करतात त्यांच्या किमती निश्‍चितपणे वाढतात.

व्यावसायिक बांधकामे
व्यावसायिक विकासामुळे प्रॉपर्टीची किंमत वाढल्याची उदाहरणे आपल्याला नोयडा, गुरगाव, पुणे, हैदराबाद, नवी मुंबई आणि मुंबईतील अंधेरी-बोरिवली भागात पाहायला मिळतात. या ठिकाणचा जबरदस्त व्यावसायिक विकास तेथील प्रॉपर्टीच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. घराजवळ मॉल्स, आयटी कार्यालये आणि सेझ क्षेत्रे असतील तर त्यामुळे लोकांचा कामाच्या ठिकाणी येण्याजाण्यात अधिक वेळ आणि शक्ती खर्च होत नाही. त्यामुळे ग्राहकही अशा ठिकाणी घर घेण्यास तयार असतात. त्यासाठी थोडी जास्त किंमत द्यायचीही त्यांची तयारी असते.

ग्राहकाकडे उपलब्ध पैसा
शेती क्षेत्रात तसेच कारखान्यांजवळ असलेल्या प्रॉपर्टीजना आयटी हब्जजवळ असलेल्या प्रॉपर्टीजच्या तुलनेत कमी किंमत मिळते. ग्राहकाच्या हातात त्याचे आर्थिक उत्पन्न आणि त्याची बचत, कर वगैरे वगळून त्याच्याकडे शिल्लक किती राहतात याच्याशी प्रॉपर्टीच्या किमतीचा थेट संबंध असतो. ग्राहकाबरोबरच प्रॉपर्टी ज्या भागात आहे त्या भागातील लोकसंख्येची आर्थिक स्थिती हा विषयही प्रॉपर्टीच्या किमतीशी निगडित आहे.
ज्या ठिकाणी प्लॉटस्‌ची संख्या अधिक असते तेथे त्यांच्या किमती कमी असतात, पण ज्या भागात प्लॉटस्‌ कमी असतात तिथे त्यांची किंमत अधिक असते.

मागणी आणि पुरवठा
विशिष्ट भागात मालमत्तेला असलेली मागणी हा घटकही तिच्या किमतीशी निगडित असतो. ज्या भागात मागणीपेक्षा उपलब्धता अधिक असेल त्या भागात किंमत अर्थातच कमी असते. जिथे मागणीपेक्षा उपलब्धता कमी असेल तिथे अर्थातच किमती जास्त असतात. मागणीच्या बाबतीत बोलायचे तर लोकसंख्येत होणारा बदल हा महत्त्वाचा असतो. एखाद्या विशिष्ट भागात राहणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर त्या भागात आपोआपच इतर सुविधा निर्माण होतात, उदाहरणार्थ, बाजार, दुकाने, शैक्षणिक संस्था वगैरे आणि मग स्वाभाविकच त्या भागात राहू इच्छिणाऱ्या लोकांची संख्याही वाढते. त्यामुळे मग त्या भागातील घरांची मागणी वाढते आणि त्यांच्या किमतीही.

योग्य दर किंवा परवडणे
घराची किंमत सामान्य ग्राहकाला परवडण्याजोगी असायला हवी. परवडण्याजोगी याचा अर्थ गृहकर्जाचे व्याजदर, प्रॉपर्टी आणि त्याचे वेतन यांचा संबंध जुळायला हवा. एखाद्या विशिष्ट भागात या तीनपैकी एक जरी अत्युच्च पातळीला पोचला तर तेथील रहिवाशी अन्य भागात पर्याय शोधायला सुरुवात करतात.

बांधकाम
ज्या इमारतीत फ्लॅट घेतला जाणार आहे त्या इमारतीचे बांधकाम हाही ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो. यात इमारत बांधताना वापरण्यात आलेले साहित्य, त्याचा टिकाऊपणा आणि इमारतीचे आयुष्य या मुद्यांचा विचार प्रामुख्याने होतो. बांधकाम सुरू असताना जे साहित्य वापरलेले असते त्याची गुणवत्ता आणि किंमत याचा परिणामही मालमत्तेच्या किमतीवर होतो. इमारतीची उंची, वॉटरप्रुफिंग, छताचा प्रकार या सगळ्याशी फ्लॅटची किंमत निगडित असते.

ग्राहकांच्या अपेक्षा
एखाद्या इमारतीत फ्लॅट घेताना ग्राहक आपल्याला हव्या तशा सुविधा बिल्डरकडून करून घेत असतात. त्या सुविधांचा खर्चही ग्राहकाला द्यावा लागतो. बिल्डर जे साहित्य इंटीरियरसाठी वापरणार असतो, त्यापेक्षा ग्राहकाला वेगळे काही हवे असेल तर बिल्डर ते करून देतो, पण त्याचा परिणाम त्याच्या घराची किंमत वाढण्यात होतो.

रियल इस्टेट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी मालमत्तेच्या योग्य किमतीचा अंदाज करण्यासाठी या सर्व घटकांचा अतिशय बारकाईने विचार करायला हवा. जे घर घेणार त्याची काळजीपूर्वक तपासणी करा, योग्य तऱ्हेने अभ्यास करा. गरज भासल्यास ती मालमत्ता विकली जाते की नाही याची चाचपणी करा आणि मग गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)