#प्रेरणा: शेकडो अधिकारी देणारे गाव

दत्तात्रय आंबुलकर

महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान इ. राज्यांमध्ये अशी अनेक खेडी आहेत ज्या ठिकाणी प्रत्येक घरटी सैन्यदलात सेवा देऊन देश-संरक्षणासाठी पिढ्यान्‌पिढ्या काम करणारी कुटुंबे आहेत. सातारा जिल्ह्यातील मिलिट्री अपशिंगे व सैनिक टाकळी या गावांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या गावांनी थेट पहिल्या महायुद्धापासून आजवर भारतीय सैन्यदलाला हजारो शिपाई पुरविले आहेत.

असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव हिमाचल प्रदेशात आहे. वर्षातील सहा महिने जगाशी संपर्क तुटणाऱ्या या गावाने आतापर्यंत अनेक आयएएस, आयपीएस व अन्य केंद्रीय सेवांसाठी अधिकारी दिले आहेत. निसर्गाच्या कुशीत व थंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या लाहोल-स्थिती घाटीत वसलेल्या या गावाचे नाव आहे ठोलंग. या गावात जेमतेम 35 घरे असून, गावची लोकसंख्या 400 च्या आसपास आहे.

या गावात साक्षरतेचा दर 100% असून प्रत्येक घरातील सरासरी तीन व्यक्‍ती सरकारी नोकरीत- उच्च पदांवर कार्यरत आहेत. दुर्गम-पहाडी क्षेत्रात असल्याने अन्य गावांप्रमाणेच ठोलंग गाव पण फारसे प्रगत झालेले नसले तरी या गावातील प्रत्येकाचा देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आणि निश्‍चय सर्वांसाठीच आदर्शवत आहे. या गावाने आतापर्यंत शेकडो आयएएस, आयपीएस, हिमाचल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी अधिकारी दिले आहेत. याशिवाय न्याय क्षेत्रात पण गावची मंडळी विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण व जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत. काहीजण विदेशातसुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडीत आहेत.

हिमाचल प्रदेशचे सेवानिवृत्त मुख्य सचिव ए. एन. विद्यार्थी, जम्मू-काश्‍मीरचे माजी सचिव ए. एस. कपूर व शेखर विद्यार्थी ही सारी मंडळी मूळची ठोलंगची. हिमाचलमध्ये परिचित असलेले रामसिंह तकी, नाजिन विद्यार्थी, नोरबू राय हे आयपीएस अधिकारी व हिमाचल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमधून बाहेर पडून विशेष उल्लेखनीय काम केलेली रघुवीरसिंह वर्मा, रामलाल ठाकूर, एस. पी. ठाकूर हे पण याच गावचे.

वास्तविक ठोलंग गावात आजही शिक्षणाच्या फारशा सोयी नाहीत. त्यात वर्षातील सहा महिने गावचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षण झाल्यावर गावच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कुलू, सिमला, चंदीगड वा दिल्ली येथेच जावे लागते. मात्र, अशा कठीण व विपरीत स्थितीतही या छोट्या गावच्या विद्यार्थी आणि पालकांनी पुढील शिक्षणाचे प्रयत्न कदापि सोडले नाहीत. ठोलंग गावात शिक्षणाचे प्रमाण 100 टक्‍के असल्याने सर्वांनाच शिक्षणाबद्दल कायमस्वरूपी आवड आहे. तशातच गावच्या शांत वातावरणात तेथील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांची शांतपणे तयारी करता येऊन त्यांना यश प्राप्त व्हावे या उद्देशाने स्वतः ठोलंगवासीय असणारे आयएएस अधिकारी एस. एस. कपूर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ एक वाचनालय उभारले आहे. अशा या गावाला सर्वांनी किमान एकदा तरी भेट देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या वयाच्या पिढ्यांना भेटायलाच हवं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)