प्रेरणा : महिलेद्वारा क्रिकेट बॅटचा यशस्वी व्यवसाय 

दत्तात्रय आंबुलकर 

काश्‍मीरच्या श्रीनगरमधील नरवर परिसरात आतंकवाद्यांचा हिंसाचार व त्यांच्या पोलिसांशी चकमकीच्या घटना या बाबी नित्याच्या झाल्या असतानाच याच परिसरात रिफत मसुदी नामक महिलेने क्रिकेट बॅट विक्रीचा व्यवसाय मोठ्या जिद्दीने व चिकाटीने चालविणे ही बाब अनेकार्थांनी चर्चेचा विषय झाली आहे. विशेष म्हणजे रिफत मसुदी जम्मू-काश्‍मीरमधील पहिल्या व एकमेव क्रिकेट बॅट व्यवसायी असून त्यांच्या या व्यवसायामुळे जम्मू-काश्‍मीरमधील अनेक जणांना रोजगाराची संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध झाली आहे हे विशेष.

रिफत मसुदी यांच्या या क्रिकेट बॅट व्यवसाय व कारखान्याला मोठा इतिहास लाभला आहे. 1990 मध्ये जम्मू-काश्‍मीरमधील मोठ्या हिंसाचारानंतर त्यांना आपला व्यवसाय काही काळासाठी बंद करावा लागला. मात्र, या परिस्थितीवर मात करूनही त्यांनी बॅट बनविण्याचा आपला कारखाना पुन्हा सुरूच केला नव्हे तर त्यामध्ये मोठी उभारी पण गाठली.
या संदर्भातील रिफत मसुदी यांचा व्यावसायिक इतिहास मोठा रंजकच नव्हे तर प्रेरक पण आहे.

1990 च्या दशकात जम्मू-काश्‍मीरमध्ये मोठ्या प्रमाणात व्याप्त हिंसाचारानंतर आपला व आपल्या कुटुंब आणि घरच्यांचा उदरनिर्वाह चालविण्याच्या दृष्टीने रिफत मसुदी यांनी तब्बल 9 वर्षांनंतर म्हणजे 1999 मध्ये जेव्हा आपल्या घरची क्रिकेट बॅट बनविण्याची फॅक्‍टरी जेव्हा पुन्हा सुरू करण्याचा निर्धारपूर्वक निर्णय घेतला तेव्हा त्याचे सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. काहीजणांनी दबक्‍या आवाजात तर काहींनी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या या निर्णयावर टीका पण केली तर काहींनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न कसोशीने केले. मात्र, रिफत मसुदी यांनी बॅट कारखाना नव्याने सुरू करण्याचा आपला निर्णय आणि निर्धार केवळ कायमच ठेवला असे नव्हे तर त्याची प्रयत्नपूर्वक अंमलबजावणी पण केली.

रिफत मसुदी यांच्या सुदैवाने त्यांच्या या व्यावसायिक प्रयत्नात त्यांच्या पतीची प्रामाणिक साथ व मार्गदर्शन मिळाल्याने त्याचे बहुविध फायदे झाले. रिफत यांचा आत्मविश्‍वास बळावण्याबरोबरच त्यांच्या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाला अल्पावधीत केवळ बरकतच नव्हे तर स्थिरता आली. मुख्य म्हणजे त्यांच्या क्रिकेट बॅट निर्मिती कारखान्यामुळे स्थानिक सुतार-रंगारी यांसारख्या कारागिरांना स्थानिक स्तरावर व त्यांच्याच गावात रोजगार मिळण्यास सुरुवात झाल्याने लोकांना त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्व समजले व सुरुवातीला रिफत यांच्यावर साशंक पद्धतीने टीका करणारे त्यांच्या प्रयत्नांना दाद देऊ लागले. यातून अर्थातच मोठे परिवर्तन घडून आले. महिला बॅट निर्मिती-विक्रीचा व्यवसाय श्रीनगरच्या अस्थिर परिसरात करते हे पाहून रिफत यांना येणारे पर्यटकच नव्हे तर महिलांसह स्थानिक रहिवासी पण दाद देऊ लागले व यातूनच रिफत मसुदी यांनी तयार केलेल्या क्रिकेट बॅट आता देश-विदेशात जात आहेत. रिफतच्या व्यावसायिक यशाचा चेंडू त्यांच्या बॅट व्यवसायामुळे केव्हाच देशाच्या पण सीमापार गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)