#प्रेरणा: मंदिराने केली रुग्णांच्या भोजनाची सोय

दत्तात्रय आंबुलकर

सेवा हाच खरा धर्म असून जिथे दरिद्रीनारायणाची सेवा केली जाते, तिथेच ईश्‍वराचा वास असतो ही सेवाभावी कल्पना धामणगाव रेल्वे येथील श्री बालाजी शाम मंदिर संस्थानने आपल्या सेवाभावी कार्यातून सिद्ध केली आहे. वर्षभरात सुमारे 10 हजार जेवणाचे डबे रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थानने सातत्यपूर्ण सुरू ठेवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी 11 वाजता श्री बालाजी शाम मंदिरातील देवासाठी तयार करण्यात आलेल्या नैवेद्यानंतर लगेच टिफिन भरून जेवणाचे डबे ग्रामीण भागातून येऊन शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना दिले जातात व त्याचा मोठाच फायदा ग्रामीण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होत असतो.
या सेवाभागी उपक्रमाची सुरुवात सुमारे तीन वर्षांपूर्वी श्री बालाजी शाम मंदिराच्या स्थापनेच्या माध्यमातून झाली.

मंदिराचे मुख्य विश्‍वस्त व धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योगपती शरद अग्रवाल यांचा पुढाकार आणि प्रयत्नातून मंदिर उभारतानाच समाजसेवी विचाराने मंदिर संस्थानने ग्रामीण रुग्णालयात विविध उपचारांसाठी भरती झालेल्या सर्व रुग्णांना दररोज टिफिनद्वारा ताजे भोजन पोहोचविण्याचे काम सुरू केले.

धामणगाव रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात भरती झालेले रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळेच या रुग्णांना मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना भोजन पुरविण्याचे ठरविले असताना प्रत्यक्षात दररोज भरती होणाऱ्या 25 ते 30 रुग्णांना भोजन देण्यात येते त्यात प्रसुत झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय असते. रुग्णांना दररोज ताजे, साधे- स्वादिष्ट व त्याचवेळी शुद्ध भोजन मिळावे, यासाठी श्री बालाजी मंदिर ट्रस्ट परिसरातच स्वयंपाकघराची व्यवस्था व त्यासाठी आवश्‍यक अशा सेंद्रीय बाजीपाल्याची व्यवस्था मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनाने केली आहे. याच स्वयंपाकघरातून खास आचाऱ्यांच्या हाताने तयार करण्यात आलेले जेवण देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर डबे रुग्णांसाठी पाठविण्यात येतात.

मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या नियोजनाद्वारे ट्रस्टी संजय अग्रवाल व संजय सावळे या दोघांकडे जबाबदारी असते ती दररोज सकाळी जाऊन रुग्णालयात किती रुग्ण भरती झाले हे बघण्याची. त्यातून रुग्णांचा आकडा त्यांच्याकडे आल्यानंतर रुग्णांसाठी आवश्‍यक तेवढे टिफिन-डबे तयार करण्यात येऊन पाठविण्यात येतात.

त्यासाठी पण निश्‍चित करण्यात आलेल्या पद्धतीनुसार टिफिन तयार झाल्यावर मंदिरात कार्यरत असणारे कर्मचारी संजय शिंदे हे रोज सेवेकऱ्याच्या भावनेने आपल्या सायकलवर टिफिन घेऊन रुग्णालयात पोहोचतो. त्याचदरम्यान रुग्णालयात शहरातील अन्य सेवाभावी कुटुंब हे अन्नछत्रासाठी केलेल्या सहकार्यातून व सेवाभावी पद्धतीने रुग्णालयात उपस्थित असतात व या कुटुंबीयांच्या हस्ते रुग्णांना भोजनाचे डबे निश्‍चित वेळी दिले जातात.

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आजवर 10 हजार टिफिन- भोजनाची व्यवस्था मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. हीच व्यवस्था एक सेवाभावी उपक्रम म्हणून शहरवासियांच्या सहकार्याने सातत्याने सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्‍त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)